सामना अग्रलेख – साईबाबा अवतरले, जन्मस्थानाचा वाद कशाला?

4087

संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताही वाद मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला नाही. पाथरी आणि शिर्डीकरांनीही तो करू नये. संतांचे तेज अशाने कमी होईल. जन्मस्थानाच्या वादाचे गालबोट त्याला लागू नये. या वादासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले, शासनाची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही बाजूंचे त्यामुळे समाधान झाले आणि एक विनाकारण उद्भवणारा वाद लगेच शमला. शेवटी साईबाबांचे अवतारकार्य, त्यांनी दिलेली शिकवण महत्त्वाची. ‘सबका मालिक एकअसे साईबाबा म्हणाले. साईबाबा अवतरले, त्यांनी जनांचा उद्धार केला हे फक्त लक्षात ठेवावे!

संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून जो वाद सुरू आहे तो श्री साईबाबांच्या कृपेनेच थांबला. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या बाबांच्या मंत्रावर आमची श्रद्धा आहे. त्यांच्या कोट्यवधी भक्तांनीही ही श्रद्धा ठेवावी. ‘शिर्डी’ या नावाचा नुसता उल्लेख केला तरी कोट्यवधी भक्तांच्या मनात, अंतरंगात ऊर्जा निर्माण होत असते. संकटकाळी एक शक्ती आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असा विश्वास निर्माण होतो. शिर्डीचे नाव येताच नकळत मस्तक श्रद्धेने झुकते व हात आपोआप जोडले जातात. अशा साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण व्हावा हे दुर्दैव आहे! साईबाबांसारखे संत या भूतलावर फक्त जन्म घेतात. त्यांनी कुठे जन्म घेतला यापेक्षा त्यांनी अवतार घेतला व त्यायोगे संपूर्ण मनुष्यजातीला कल्याणाचा मार्ग दाखवला हे महत्त्वाचे.

शिर्डीस ज्याचे लागतील पाय,

टळतील त्याचे सर्व अपाय!’

या श्रद्धेला आजपर्यंत तरी तडा गेला नाही. स्वतः श्री साईबाबांनी संपूर्ण हयातीत आपली जात, धर्म, वंश, जन्म याविषयी कोणतीही माहिती कुणालाही सांगितली नाही. ते परभणीच्या पाथरीत जन्मले व पायी चालत शिर्डीकडे आले व तेथेच विसावले असे काही अभ्यासक म्हणतात. पुढे त्यांनी समाधी शिर्डीतच घेतली. पाथरीही महाराष्ट्रात व शिर्डीही महाराष्ट्रातच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीत परभणीतील पाथरीचा उल्लेख ‘साईंचे जन्मस्थान’ असा केला व पाथरीच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावर ‘शिर्डी’चे ग्रामस्थ नाराज झाले. ‘पाथरी’चा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी स्वतःच संशोधन करून केलेला नाही किंवा त्यांच्या मनात काहीतरी अचानक आले म्हणून त्यांनी पाथरीचा संदर्भ दिला नाही. जुन्या काळातील साईभक्तांनी, साईचरित्रकारांनी, इतिहासकारांनी जे नोंदवून ठेवले, त्याचाच संदर्भ घेऊन मुख्यमंत्री बोलले. पाथरीच्या विकासासाठी 100 कोटी मिळाले, पण शिर्डी तर साईंच्या वास्तव्याने सोन्याची झाली व शिर्डीत मुंग्यांप्रमाणे भक्तांची रांग लागलेलीच असते. साईबाबा संत होते व त्यांच्याविषयी ज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्या

तशाच राहायला

हव्यात. ते नगर जिह्यातील शिर्डी गावी प्रकट झाले (तेथे ते जन्मले काय, हे कुणीच सांगू शकत नाही). त्यांचे चरित्र अनेक चमत्कारांनी व दंतकथांनी भरलेले आहे. 19 मे 1917 रोजी लोकमान्य टिळक कै. दादासाहेब खापर्डे यांच्याबरोबर साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे आले होते. बाबांनी त्यांना जेवण करून थोडा आराम करून, मग पुढे जाण्यास सांगितले होते. टिळकांनी बाबांना आपल्या देशाच्या स्वराज्याच्या कार्याबद्दल सल्ला विचारला होता आणि अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांना उत्तर दिले होते, “तुमचे आता वय झाले आहे. विश्रांतीची गरज आहे. तुम्ही आता आराम का करीत नाही?’’ पुढे खरोखरच लोकमान्यांचे लवकरच म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले आणि त्यांचे स्वराज्याचे कार्य अपुरे राहिले. साईबाबांनी पाण्याने पणत्या पेटवल्या व उदीने अनेकांना बरे केले असे असंख्य चमत्कार आहेत. हातात एक पत्र्याचा टमरेल, खांद्याला मळकट कापडाची एक झोळी, अंगात कफनीसारखा ढगळ अंगरखा, डोक्याला फकिरासारखे फडके बांधलेले अशा वेशात साईबाबांनी शिर्डीत प्रथम प्रवेश केला तेव्हा ते कोण, कोठून आले, त्यांचे नाव-गाव काय हे कुणालाच माहीत नव्हते. शिर्डी गावाबाहेरच्या खंडोबाच्या देवळाजवळ ते येऊन थांबले, तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना मुसलमान समजून देवळात प्रवेश करण्यापासून रोखले. त्यामुळे ते देवळाबाहेरच्या वटवृक्षाखाली चिलीम फुंकीत बसून राहिले. एवढय़ात त्या खंडोबाच्या देवळाचे मालक म्हाळसापती सोनार तिथे आले व त्या फकिरास म्हणाले, “आवो, साईबाबा!’’ तेव्हापासून सर्व लोकांचे ते साईबाबा झाले. म्हाळसापतीने साईबाबांना शिर्डी गावात आणून त्यांची चांगल्या जागेत व्यवस्था केली. त्यानंतर देह ठेवीपर्यंत साईबाबा शिर्डीतच राहिले व शिर्डी हे जगभरासाठी तीर्थस्थान बनले. बाबा तरुणपणी शिर्डीत आले व शिर्डीचे भाग्य उजळले. मात्र बाबा शिर्डीला नक्की कोठून आले, पाथरी येथून आले का, याबाबत परभणीच्या सरकारी गॅझेटमध्ये ‘काहींच्या मते हे गाव शिरडीचे संत साईबाबांचे जन्मस्थान असावे’ असा उल्लेख आहे. हे गॅझेट नव्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले किंवा छापलेले नाही. त्यामुळे साईंच्या

जन्मस्थानाच्या वादाचा दोष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी फोडू नये. साईबाबांमुळे शिर्डी श्रीमंत झाली, ती श्रीमंती कोणीच हिरावून घेणार नाही. कारण भक्तांची न संपणारी रांग शिर्डीस सदैव लागली आहे व आता तर तेथे विमानतळही झाले आहे. साईबाबा संस्थानची संपत्ती 2693 कोटी आहे व रोज मंदिराच्या दानपेटीत लाखो रुपयांचे दान भक्त देत आहेत. वर्षाला कोट्यवधी रुपये मंदिरात जमा होतात व त्यातून मोठे सामाजिक कार्य घडवले जाते. हे सर्व एका संतामुळे घडते. जे फकीर म्हणून जन्मले व फकीर म्हणून शिर्डीत अवतरले, त्या फकिराच्या जन्मस्थानावरून वाद कशाला? त्यामुळे शिर्डीचे महत्त्व कमी होणार नाही. राम अयोध्येतच जन्मास आले. फक्त जमिनीच्या तुकडय़ाचा वाद होता, पण अयोध्या रामाचीच. छत्रपती शिवराय शिवनेरीवर जन्मले व रायगड ही स्वराज्याची राजधानी त्यांनी केली. महाराजांनी देह ठेवला रायगडावर, रायगड तीर्थक्षेत्र बनले, म्हणून शिवनेरीचे महत्त्व कमी झाले नाही. संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताही वाद मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला नाही. पाथरी आणि शिर्डीकरांनीही तो करू नये. संतांचे तेज अशाने कमी होईल. जन्मस्थानाच्या वादाचे गालबोट त्याला लागू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिर्डीकरांसोबत झालेल्या बैठकीत पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे, तर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचा भाग म्हणून शासन निधी देईल असे स्पष्ट केले. त्यावर शिर्डीकरांचेही समाधान झाले आणि त्यांनी बंद मागे घेतला हे चांगलेच झाले. या वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले, शासनाची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही बाजूंचे त्यामुळे समाधान झाले आणि एक विनाकारण उद्भवणारा वाद लगेच शमला. शेवटी अशा वादांपेक्षा साईबाबांचे अवतारकार्य, त्यांनी दिलेली शिकवण महत्त्वाची. ‘सबका मालिक एक’ असे साईबाबा म्हणाले. साईबाबा अवतरले, त्यांनी जनांचा उद्धार केला हे फक्त लक्षात ठेवावे!

आपली प्रतिक्रिया द्या