सामना अग्रलेख – शिवसेनेचा वचननामा, महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य!

2286

शिवसेनेचा वचननामा हा फक्त फडफडणारा कागद नाही तर महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. महाराष्ट्राला पुन्हा परमवैभवाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प’, तो पूर्ण करण्याचा निर्धारआणि त्यासाठी लागणारी हिंमत म्हणजे शिवसेनेचा वचननामा. इतिहासाशी इमान राखत नवा महाराष्ट्र घडविण्याची शपथ म्हणजे शिवसेनेचा वचननामा. त्याची पूर्तता करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्याची हीच ती वेळआहे.

निवडणूक आली की, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे पीक तरारून येते. आताही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यांचे कागद फडफडत आहेत. त्यांचे नेते प्रचारांतून, सभांमधून हे कागद जनतेसमोर फडकवीत आहेत. या कागदांवर त्याच त्या आश्वासनांची बाराखडी गिरविण्यात आली आहे. जाहीरनाम्यांचा असा धुरळा उडालेला असताना शिवसेनेनेदेखील आपल्या वचननाम्याचा ‘भगवा’ एका दिमाखात फडकवला आहे. शेतकऱयांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, कष्टकरी-कामगारांपासून व्यापारी-उद्योजकांपर्यंत, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, आरोग्यापासून पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश या वचननाम्यात आहे. ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता सर्वाधिक काळ उपभोगली त्यांच्याही जाहीरनाम्यांमध्ये अनेक आश्वासनांची भरताड भरलेली आहेच. मग शिवसेनेच्या वचननाम्यात वेगळे काय आहे? शिवसेनेच्या वचननाम्यात वचनपूर्तीची बांधिलकी आहे, संकल्प आहे, हिंमत आहे. मागील पाच वर्षे महाराष्ट्रभर फिरताना जे अनुभव आले, दुष्काळग्रस्त भागातील जनता, कर्जबाजारी शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय या सर्वांच्या ज्या व्यथा जाणवल्या ती प्रत्येक व्यथा म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातील वचन आहे. इतरांचे जाहीरनामे आणि शिवसेनेचा वचननामा यात

हाच फरक

आहे. 1995 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते तेव्हा झुणका-भाकर केंद्रासह असंख्य वचनांची पूर्तता शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने झालीच होती. आताही 10 रुपयांत पोटभर सकस जेवण, अवघ्या एक रुपयात आरोग्याशी संबंधित 200 चाचण्या, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करण्याबरोबरच दुर्बल घटकांतील शेतकऱयांच्या खात्यात दरवर्षी दहा हजार रुपये जमा करणे, 300 युनिटपर्यंत वीजदरात 30 टक्के कपात, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा, वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, आर्थिक दुर्बल कुटुंबांमधील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण मोफत, मुख्यमंत्री आवास योजनेद्वारे प्रत्येकाला स्वतःचे घर अशी अनेक वचने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिली आहेत. आता त्यावरूनही विरोधकांच्या पोटात मुरडा मारून आलाच आहे. या वचनांची पूर्तता करण्यासाठी पैसा कोठून आणणार, असा प्रश्न ही मंडळी तोंडाचा ‘चंबू’ करीत विचारत आहेत. मुळात जनता या सर्वांचे ‘चंबू गबाळे’ याही निवडणुकीत आवरणार आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीची चिंता करू नये. पुन्हा सर्वाधिक काळ सत्तेत राहूनही जनकल्याणाच्या नावाखाली स्वतःचे कोटकल्याण करणाऱयांना आणि योजनांच्या नावाने महाराष्ट्राच्या डोक्यावर अब्जावधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा करणाऱयांना हा प्रश्न विचारण्याचा कुठलाही अधिकार नाही. ज्यांनी फक्त कर्जाचा आणि महाराष्ट्राच्या

अधोगतीचा वारसा

विद्यमान युती सरकारच्या पारडय़ात टाकला आहे त्यांनी असे प्रश्न करावेत, हा एक विनोदच आहे. तरीही ही सगळी वचने राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच दिली आहेत हे आम्ही जनतेला नम्रपणे सांगत आहोत. पुन्हा जनकल्याणाच्या योजनांसाठी थोडाफार पैसा सरकारला उभा करावा लागला तर ते सरकारचे कर्तव्यच असते. तेव्हा विरोधकांनी आधी त्यांच्या फडफडणाऱया जाहीरनाम्यांचा आणि त्यातील आश्वासनांचा विचार करावा. तुमच्या जाहीरनाम्याची फडफड ही फक्त सत्तेसाठीची तडफड असते आणि शिवसेनेचा वचननामा म्हणजे प्रगतशील महाराष्ट्रासाठी केलेला संकल्प असतो हे आता जनतेने ओळखले आहे. शिवसेनेचा वचननामा हा फक्त फडफडणारा कागद नाही तर महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. म्हणूनच आम्ही दिलेले एकही वचन खोटे ठरणार नाही असे महाराष्ट्राच्या जनतेला निःसंदिग्धपणे सांगत आहोत. महाराष्ट्राला पुन्हा परमवैभवाच्या शिखरावर नेण्याचा ‘संकल्प’, तो पूर्ण करण्याचा ‘निर्धार’ आणि त्यासाठी लागणारी हिंमत म्हणजे शिवसेनेचा वचननामा. इतिहासाशी इमान राखत नवा महाराष्ट्र घडविण्याची शपथ म्हणजे शिवसेनेचा वचननामा. त्याची पूर्तता करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. वचननाम्यातील प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू हा आमचा महाराष्ट्राला दिलेला शब्द आहे.

आपली प्रतिक्रिया द्या