
ट्रम्प यांना औषध क्षेत्रातही अमेरिकेला आत्मनिर्भर करायचे आहे व ट्रम्प यांनीही त्यांच्या देशात स्वदेशीचा नारा दिला. भारतात मोदी यांनीही स्वदेशीचा नारा दिला. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी हेच परदेशी वस्तूंचा सगळ्यात जास्त वापर करतात. गृहमंत्री अमित शहांचे सुपुत्र जय शहा हे क्रिकेट उद्योगाच्या निमित्ताने दुबईतच असतात. केंद्रीय मंत्र्यांची मुले परदेशात (खासकरून अमेरिकेत) गलेलठ्ठ पगारावर काम करतात व इथे त्यांचे बाप स्वदेशीवर भाषणे झोडतात. ट्रम्प यांनी स्वदेशीचा नारा देऊन भारतीय औषध कंपन्यांची कोंडी केली आहे. मोदी त्यावर गप्प आहेत. ट्रम्प यांनी मोदींना गप्प बसण्याची कोणती गोळी दिली आहे, ते या सर्व औषध कंपन्यांनाच माहीत.
भारतात आरोग्य सेवा आधीच महाग आहे. सरकारची आरोग्य सेवा म्हणजे झूठ आणि भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावून भारतीय औषध कंपन्यांना धक्का दिला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर 100 टक्के टॅरिफने भारतातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. भारतातील औषध व्यापार दोन लाख कोटींचा आहे. भारताला जगाची फार्मसी म्हटले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत औषध कंपन्यांच्या उलाढालीचे मोठे योगदान आहे. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या औषधांत मोठा वाटा भारताचा आहे. अमेरिकेत वितरित होणाऱ्या प्रत्येक 10 प्रिस्क्रिप्शनपैकी 4 प्रिस्क्रिप्शन भारतीय औषध कंपन्यांची असतात. हाय ब्लडप्रेशर, लिपिड रेक्युलटर, डायबेटिस, मेंटल हेल्थ, न्यूरो, अल्सरबाबतची औषधे अमेरिकेत भारतातून जातात. या सगळ्या औषधनिर्मिती कंपन्यांना प्रे. ट्रम्पच्या टॅरिफने फटका बसला असून या धक्क्यातून सावरण्यासाठी कोणतेही औषध या औषध उद्योगांकडे नाही. ट्रम्प यांच्या निर्णयाने भारतातील औषध उद्योग हेलकावे खाईल व आपले आर्थिक गणित सावरण्यासाठी भारतात औषधांच्या किमती वाढवल्या जातील. त्याचा परिणाम गरीब, मध्यमवर्गीयांच्या आरोग्य सेवेवर होईल. प्रे. ट्रम्प हे भारतीय उद्योग व्यापारावर सूड घेतल्यासारखे वागत आहेत. भारताची अर्थव्यवस्था त्यांना संपवायची आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याची जी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, त्यास सुरुंग लावायचा आहे हे नक्की. कोणाला
धडा शिकवण्याचे
हे उद्योग प्रे. ट्रम्प करीत आहेत? अमेरिकेला औषध निर्यात करणाऱ्या पाच प्रमुख भारतीय कंपन्या आहेत. त्यात सन फार्मा, डॉ. रेड्डीज, सिप्ला, लुपिन, अरविंदो फार्माचा समावेश होतो. देशातील औषध उद्योग या पाच कंपन्यांच्या इशाऱ्यावर चालतो. या उद्योगाचे हे पंचक ‘डॉन’ आहेत. मोदी व त्यांच्या पक्षाचे सगळ्यात मोठे देणगीदारदेखील हेच आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपची तिजोरी फुगवण्यात या फार्मा कंपन्यांचा मोठा हातभार आहे. पी.एम. केअर फंडातही याच कंपन्यांचे आकडे मोठे आहेत. फार्मा कंपन्यांनी पी.एम. केअर फंडात सव्वा लाख कोटींचे दान दिले, असे सांगितले जाते. हे आकडे खरे असतील तर प्रे. ट्रम्प हे मोदींच्या अर्थपुरवठादारांचे कंबरडे मोडत आहेत व ती एक सुनियोजित रणनीती आहे. प्रे. ट्रम्प हा वाटतोय तितका मूर्ख माणूस नसावा. ट्रम्प यांनी औषध कंपन्यांवर लादलेला टॅरिफ म्हणजे ‘अमेरिका फर्स्ट’ व्यापार धोरणाचा भाग आहे. अमेरिकेतच औषध उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे आणि परदेशी औषधांवर अवलंबून राहणे कमी व्हावे हे ट्रम्पचे धोरण आहे. म्हणजे मोदी व त्यांचे लोक आपल्या भारतात जो स्वदेशीचा नारा देत आहेत, आत्मनिर्भरतेचे बॅण्ड वाजवत आहेत तेच प्रे. ट्रम्प त्यांच्या अमेरिकेत करत आहेत. अमेरिकेत हजारो कोटींची औषधे निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्या त्यांच्या नफ्यातील मोठा वाटा भाजपच्या निवडणूक खात्यात जमा करतात. देशातील जनतेला त्याचा फायदा होत नाही. प्रे. ट्रम्प यांनी भारतीय औषध उद्योगांच्या मानेवर पाय ठेवला तो बहुधा यासाठीच. भारतात आरोग्य, आरोग्य विमा हा एक मोठा उद्योग झाला व त्यात सेवा कमी आणि
फसवाफसवी जास्त
आहे. भारतातून अमेरिकेत जेनेरिक औषधांची निर्यात होते. ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांना टॅरिफमधून वगळले आहे. तरीही भारतीय फार्मा उद्योग अमेरिकेतील निर्यातीत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ज्या भारतीय कंपन्या अमेरिकेत त्यांचे उत्पादन करीत आहेत (मेक इन अमेरिका) त्यांना टॅरिफचा फटका बसणार नाही, पण 32,000 कोटींचे औषध निर्यातदार संकटात येतील. ट्रम्पच्या नव्या टॅरिफ घोषणेनंतर व्होकार्ट, सन फार्मा, बायोकॉन कंपन्यांचे शेअर कोसळले; तर वॉल स्ट्रीटला मर्क, एली लिली, जे अॅण्ड जे या कंपन्यांचे शेअर वर गेले. या कंपन्यांनी अमेरिकेत त्यांचे उत्पादन युनिट आधीच सुरू केले. भारताच्या औषध कंपन्यांना आता अमेरिकेत त्यांचे उद्योग, उत्पादन युनिटस् टाकावी लागतील. म्हणजे भारतातील रोजगाराला याचा फटका बसेल. पाच कंपन्या 38 हजार कोटींची निर्यात फक्त अमेरिकेत करतात. या निर्यातीवरील ‘कर’ वगैरे हा लाभ कमी होईल. कारण ट्रम्प यांना औषध क्षेत्रातही अमेरिकेला आत्मनिर्भर करायचे आहे व ट्रम्प यांनीही त्यांच्या देशात स्वदेशीचा नारा दिला. भारतात मोदी यांनीही स्वदेशीचा नारा दिला. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी हेच परदेशी वस्तूंचा सगळ्यात जास्त वापर करतात. गृहमंत्री अमित शहांचे सुपुत्र जय शहा हे क्रिकेट उद्योगाच्या निमित्ताने दुबईतच असतात. केंद्रीय मंत्र्यांची मुले परदेशात (खासकरून अमेरिकेत) गलेलठ्ठ पगारावर काम करतात व इथे त्यांचे बाप स्वदेशीवर भाषणे झोडतात. ट्रम्प यांनी स्वदेशीचा नारा देऊन भारतीय औषध कंपन्यांची कोंडी केली आहे. मोदी त्यावर गप्प आहेत. ट्रम्प यांनी मोदींना गप्प बसण्याची कोणती गोळी दिली आहे? ते या सर्व औषध कंपन्यांनाच माहीत.