आजचा अग्रलेख : सातारचे राजे

9001
udayanraje-bhosale

शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!

सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा मार्ग स्वीकारला आहे. आयाराम-गयारामांचा मुसळधार मोसम सध्या सुरूच आहे. पाऊस थांबत नाही तसा हा मोसमही थांबत नाही. इतर सर्व मंडळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेत असतात, पण उदयनराजे हे शिवरायांच्या सातारच्या गादीचे तेरावे वंशज असल्याने त्यांचा प्रवेश अमित शहा यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर झाला आहे. उदयनराजे हे शिवरायांचे 13 वे वंशज आहेत म्हणून समाजात त्यांना मान आहे, पण असे शिवरायांचे थेट वंशज कोल्हापूरच्या गादीचे संभाजी छत्रपतीदेखील आहेत व महाराष्ट्रातील विविध सामाजिक उपक्रमांत कोल्हापूरचे छत्रपती आघाडीवर असतात. संभाजी छत्रपती हे राज्यसभेत आहेत व भाजपने त्यांना नेमले आहे. भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. सातारचे राजे युती परिवारात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपविषयी भूमिका वेगळी होती व ती टोकाची होती. ‘‘कोण मोदी? आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत’’ असे त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करीत बजावले होते. मोदींच्या सरकारने लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिले असा संताप त्यांनी कॉलर उडवत व्यक्त केला होता. आता त्यांनी मन बदलले आहे व मोदी-शहा हे शिवरायांच्या विचाराने कार्य करीत असल्याचे विचार मांडले आहेत. उदयनराजे यांचे

‘ईव्हीएम’विषयीदेखील वेगळे मत

होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना जेरीस आणलेच होते. एरवी तीन-चार लाखांच्या मताधिक्याने जिंकणारे राजे या वेळी ‘दम’ खात जिंकले. उदयनराजे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते व साताऱ्यातील तरुण वर्गात त्यांचा वावर आहे. उदयनराजे यांना जाळय़ात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हेत, तर सर्वच जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल. अर्थात उदयनराजे यांनी अत्यंत विचारपूर्वकच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असेल. सातारचे शेवटचे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह भोसले यांचे उदयनराजे हे वारसदार. प्रतापसिंह हे सातारच्या छत्रपती घराण्यातील धाकटय़ा शाहूंचे वडीलपुत्र. पेशव्यांच्या ताब्यातून सुटण्यासाठी त्यांनी व त्यांच्या मातोश्रींनी इंग्रजांची मदत मागितली. मदत देण्याचे एल्फिन्स्टनने आनंदाने कबूल केले. त्यावेळी इंग्रज आणि पेशवे यांची लढाई चालू होती. पेशव्यांचा, बापू गोखल्यांचा पाडाव झाला. ठरल्याप्रमाणे प्रतापसिंह लष्कराच्या मागे उभेच राहिले होते. त्यांना स्मिथने ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एल्फिन्स्टनकडे केली. त्यापूर्वीच सातारा इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. इंग्रज आपला मान राखत नाहीत व आपणावर अपमानास्पद अटी लादत आहेत असे प्रतापसिंहांना समजल्यावर त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाळय़ा सुरू केल्या आणि

बेबनाव होऊन

छत्रपतींना पदभ्रष्ट व्हावे लागले. त्यांच्यावर बंडाचा आरोप ठेवून त्यांना कराचीत ठेवण्यात आले. तेथे त्यांचे खूपच हाल झाले. प्रतापसिंह सत्याचे मोठे पुरस्कर्ते आणि निश्चयी होते. पदभ्रष्ट करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी तोंडावर ताडकन जबाब दिला, ‘‘राज्य जाईल अशी धमकी देता कशाला? मी कधीच राज्याची हाव धरलेली नाही. उघड चौकशीशिवाय केलेले आरोप मुकाट्याने मान्य करून राज्यावर राहण्याची माझी इच्छा नाही. लक्षात ठेवा, प्रतापसिंहाची मान रेसभरसुद्धा वाकणार नाही. फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरून मी आपले चारित्र्य कलंकित करून घेणारा नव्हे. तुमच्या चिठोऱ्यांवर मी नाही सही करीत, जा.’’ असे बाणेदारपणे सांगून स्वाभिमानाने मरण पत्करणाऱ्या छत्रपती प्रतापसिंहांचे उदयनराजे हे वंशज आहेत याचे भान ते निश्चितपणे ठेवतील. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!

आपली प्रतिक्रिया द्या