
राज्यभरातील सुमारे 50 ते 60 हजार हेक्टरवरील पीक अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे. त्यात पुढील आठवड्यातही अवकाळीचा तडाखा बसण्याची भीती आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आणि नुकसानीचा आकडा वाढणार, हे निश्चित आहे. बळीराजाला हातातोंडाशी आलेले पीक कसे वाचवावे याची काळजी आहे. सत्ताधाऱ्यांना एकमेकांचे पत्ते कसे कापता येतील याची चिंता आहे. शेतकरी म्हणतोय, ‘‘फक्त पंचनामे नकोत, तत्काळ नुकसान भरपाई द्या.’’ सत्ताधारी म्हणत आहेत, ‘‘थांबा, पंचनामे सुरू आहेत.’’ शेतकरी म्हणतोय, ‘‘अवकाळीचा ‘फेरा’ आला आहे, आम्हाला वाचवा!’’ सत्ताधारी म्हणत आहेत, ‘‘खरात फाइल्स’, ‘व्हिडीओ-ऑडिओ स्कॅण्डल्स’, आमच्यातील शह-काटशह, हाणामाऱ्या यातून वेळ मिळेल तेव्हा बघू!’’
महाराष्ट्र मानवनिर्मित संकटे आणि नैसर्गिक आपत्ती अशा दुहेरी कोंडीत वारंवार सापडत आहे. इराण युद्धामुळे शेतीसह सर्वच क्षेत्रांना आधीच फटका बसला आहे. त्यात आता अवकाळी पाऊस-गारपीट आणि उन्हाचा तडका अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीची भर पडली आहे. पुढील किमान आठवडाभर राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्याच आठवड्यात मराठवाड्यासह प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि इतर भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा मारा झाला होता. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले होते, परंतु आता पुन्हा वादळी पाऊस आणि गारपीट यांच्या इशाऱ्याने बळीराजाची चिंता वाढवली आहे. जेथे अवकाळीचा जोर ओसरला होता, तेथे आता उन्हाचा तडका अचानक दुपटीने वाढला आहे. त्याचाही परिणाम पिकांवर, फळे आणि भाज्यांवर होत आहे. कोकणात काही भागांत तर गुरुवारी अवकाळीने पुन्हा वक्रदृष्टी फिरवली. आंबा हंगाम सुरू होण्याच्या ऐन उंबरठ्यावर पावसाने घात केला. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे वाढलेली उष्णता अशा
दुहेरी कोंडीत
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी आणि व्यापारी सापडला आहे. यंदा काजू आणि आंब्याचा मोहर चांगला आल्याने काजू-आंबा उत्पादकांना आशा निर्माण झाली होती. मात्र अचानक वाढलेली उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे त्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. जे पीक हाताशी राहिले आहे तेदेखील पुढील आठवड्यातील वादळी पावसामुळे हातचे जाईल की काय, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना वाटत आहे. मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका यांच्यासह कांदा, द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी, मोसंबी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, कांदा आता काढणीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी तो काढूनही ठेवला आहे. मात्र अवकाळीने अशा सर्वच पिकांची नासाडी केली आहे. फळांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात कधी अतिवृष्टी, कधी पावसाने दिलेली ओढ शेतकऱ्यांचे नुकसान करते, तर रब्बी हंगामात हातातोंडाशी आलेल्या पिकांवर अवकाळी पाऊस आणि
गारपिटीचे संकट
कोसळते. आताही तेच होत आहे. महाराष्ट्रातील तब्बल 24 जिह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली पिके, फळे, भाजीपाला शेतातच आडवा झाला आहे. काढून ठेवलेले पीक भिजल्यामुळे वाया गेल्यात जमा आहे. प्राथमिक माहितीनुसार राज्यभरातील सुमारे 50 ते 60 हजार हेक्टरवरील पीक अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे. त्यात पुढील आठवड्यातही अवकाळीचा तडाखा बसण्याची भीती आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आणि नुकसानीचा आकडा वाढणार, हे निश्चित आहे. बळीराजाला हातातोंडाशी आलेले पीक कसे वाचवावे याची काळजी आहे. सत्ताधाऱ्यांना एकमेकांचे पत्ते कसे कापता येतील याची चिंता आहे. शेतकरी म्हणतोय, ‘‘फक्त पंचनामे नकोत, तत्काळ नुकसान भरपाई द्या.’’ सत्ताधारी म्हणत आहेत, ‘‘थांबा, पंचनामे सुरू आहेत.’’ शेतकरी म्हणतोय, ‘‘अवकाळीचा ‘फेरा’ आला आहे, आम्हाला वाचवा!’’ सत्ताधारी म्हणत आहेत, ‘‘खरात फाइल्स’, ‘व्हिडीओ-ऑडिओ स्कॅण्डल्स’, आमच्यातील शह-काटशह, हाणामाऱ्या यातून वेळ मिळेल तेव्हा बघू!’’































































