सामना अग्रलेख – अवकाळीचे संकट!

आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यांचे तडाखे राज्याच्या मोठ्या भागाला बसत आहेत. सुमारे एक लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीक त्यामुळे धोक्यात आले आहे. बळीराजाच्या या नुकसानीची राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाणीव तरी आहे काय? अनेक ठिकाणी शेतातली पिके अवकाळीने आडवी केलेली दिसत असूनही प्रशासनाने ‘नुकसान नाही’ असे शेरे मारून प्राथमिक अहवाल दिल्याच्या तक्रारी आहेत. तोंडाने ‘शेतकरी प्रथम’ म्हणणाऱ्या या सत्ताधाऱ्यांची ‘करणी’ ही अशी शेतकरीविरोधी आहे. नाहीतरी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन या मंडळींनी वाऱ्यावर सोडलेच आहे. आता निदान अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तरी वाऱ्यावर सोडू नका.

महाराष्ट्रासह देशभरात सध्या भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या अद्वितीय हवाई हल्ल्याचीच चर्चा सुरू आहे. प्रसारमाध्यमांची आणि समाजमाध्यमांची जागाही त्या कामगिरीने आणि त्यावरील प्रतिक्रियांनी व्यापली आहे. हे सगळे स्वाभाविकही आहे, परंतु प्रामुख्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या स्थितीत अवकाळीच्या तडाख्यांचे भान राखणे गरजेचे आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्याच्या विविध भागांना अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचे तडाखे बसत आहेत. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुन्हा हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी तीन-चार दिवस अवकाळीचा तडाखा महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हे संकट महाराष्ट्रासह काही राज्यांवर ओढवले आहे. महाराष्ट्रात कोकणपासून मराठवाडा-विदर्भापर्यंत आणि प. महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सर्वदूर अवकाळीमुळे पिकांची आणि फळबागांची हानी झाली आहे. प्रामुख्याने रब्बी पिकांचे नुकसान जास्त झाले आहे. राज्यातील 21 जिल्हय़ांमध्ये सुमारे 97 हजार हेक्टरवरील

पिकांना फटका

बसला आहे. कांदा, तूर, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भात कापणी आणि मळणीला आलले धान पीक जमीनदोस्त झाले आहे. कोकणातील आंब्यावर या अवकाळी पावसामुळे फुलकिडी आणि फळमाशी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. काजूवरही ढेकण्या रोगाचे सावट आहे. पालघर जिल्ह्यात पोफळीच्या बागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड हजार हेक्टरवरील फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा, गहू, टोमॅटोचा समावेश आहे. शिवाय द्राक्षे, आंबा, डाळिंब या फळांनाही फटका बसला आहे. रायगड जिल्हय़ात तर बिचाऱ्या वीटभट्टीवाल्यांनाही आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला आणि येथील शेतकऱ्याला अवकाळी पाऊस आणि गारपीट या संकटांचा तडाखा दरवर्षीच सहन करावा लागत आहे. हवामान खाते अंदाज व्यक्त करते, सरकार नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देऊन हात वर करते. शेवटी प्रत्यक्ष नुकसान शेतकऱ्यांनाच सहन करावे लागते. नुकसान झाल्यावर त्याचे पंचनामे होण्यापासून प्रत्यक्ष नुकसानभरपाईचे धनादेश हातात मिळेपर्यंत ‘अवकाळी परवडला, पण

सरकारची नुकसानभरपाई

नको’, अशी भयंकर अवस्था शेतकऱ्यांची झालेली असते. पुन्हा एवढे सगळे सहन केल्यावर अनेकांच्या हातात नुकसानभरपाई म्हणून 30-35 रुपयांचा धनादेश पडतो. अवकाळीमुळे होणारे नुकसान आणि नंतर सरकारी यंत्रणेकडून नुकसानभरपाईच्या नावाखाली होणारी क्रूर थट्टा हा आता राज्यातील बळीराजाचा दरवर्षीचा भोग झाला आहे. या वर्षीही चित्र वेगळे नाही. आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यांचे तडाखे राज्याच्या मोठ्या भागाला बसत आहेत. सुमारे एक लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीक त्यामुळे धोक्यात आले आहे. बळीराजाच्या या नुकसानीची राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाणीव तरी आहे काय? अनेक ठिकाणी शेतातली पिके अवकाळीने आडवी केलेली दिसत असूनही प्रशासनाने ‘नुकसान नाही’ असे शेरे मारून प्राथमिक अहवाल दिल्याच्या तक्रारी आहेत. तोंडाने ‘शेतकरी प्रथम’ म्हणणाऱ्या या सत्ताधाऱ्यांची ‘करणी’ ही अशी शेतकरीविरोधी आहे. नाहीतरी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन या मंडळींनी वाऱयावर सोडलेच आहे. आता निदान अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तरी वाऱ्यावर सोडू नका.