सामना अग्रलेख – महासत्तेची मानहानी!

3660

अमेरिकेची अफगाणिस्तानातील  माघार हिंदुस्थानसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पाकिस्तानच्या इशाऱयावर नाचणारे तालिबानी सत्तेत येणे हिंदुस्थानला परवडणारे नाही. कधीकाळी हाच अफगाण संपूर्ण हिंदू होता. अखंड हिंदुस्थानचा भाग होता. महाभारतातील गांधार आणि गांधारी अफगाणिस्तानचीच. तेथील हिंदुकुश पर्वतही तीच साक्ष देतो. अखंड हिंदुस्थानच्या प्राचीन भागावर तालिबान्यांचा नव्याने होणारा कब्जा दुसरे महाभारत तर घडवणार नाही ना? 

अमेरिका आणि तालिबान यांच्यात गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेले युद्ध आता थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. कतारची राजधानी दोहा इथे अलीकडेच तालिबान व अमेरिकेतील वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि उभय देशांत सुमारे दोन दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याच्या दृष्टीने दोन पावले नक्कीच पुढे पडली. या ऐतिहासिक शांतीचर्चेत हिंदुस्थानसह सुमारे 50 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दहशतवादाला थारा न देण्याच्या अमेरिकेच्या अटी-शर्ती तालिबानने मान्य केल्या आणि या चर्चेबरहुकूम सगळे काही ठरल्याप्रमाणे घडले तर येत्या 14 महिन्यांत अमेरिकेचे संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानातून मागे घेतले जाईल असा ऐतिहासिक समझोता उभय पक्षांत झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि तालिबानच्या प्रमुख नेत्यांनी या करारावर स्वाक्षऱया केल्या. तालिबानचे तब्बल 31 प्रतिनिधी या वाटाघाटींमध्ये सहभागी झाले होते. अर्थात अमेरिका व तालिबान यांच्यात 18 वर्षे चाललेल्या युद्धात आणि आता दोहा येथे झालेल्या तहात अमेरिकेची पीछेहाट झाली म्हणण्यापेक्षा सपशेल पराभव झाला असेच म्हणावे लागेल. अल कायदा, इसिस या कुख्यात अतिरेकी संघटना व या संघटनांचे म्होरके ओसामा बिन लादेन आणि अबू बक्र अल बगदादी यांच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध जसे अमेरिकेने जिंकले, तसा विजय अमेरिकेला तालिबानवर नक्कीच मिळवता आलेला नाही. वास्तविक, तालिबानच्या जन्मापूर्वी 90 च्या दशकात अफगाणिस्तानात रशियाचा दबदबा होता. तो संपवण्यासाठी अमेरिका व पाकिस्तान दोघांनी मिळून तालिबानची निर्मिती केली. तोच राक्षस पुढे अमेरिकेवर उलटला.

1996 मध्ये कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष नजीबउल्लाह यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या कचेरीतून बाहेर खेचून तालिबान्यांनी भरचौकात फासावर लटकवले आणि अफगाणिस्तानची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर इस्लामी शरीयत लागू करून तालिबान्यांनी क्रौर्याचा कळस गाठला. याच सुमारास लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर ‘9/11’चा भयंकर हल्ला केला. हल्ल्यानंतर लादेन व अल कायदाच्या अतिरेक्यांना तालिबानने आश्रय दिल्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्य घुसवून तालिबानशी युद्ध पुकारले. तालिबानला संपवून टाकू, तालिबानचे दहशतवादी अड्डे नष्ट करू आणि अफगाणिस्तानी जनतेला तालिबानच्या जुलमी आणि अत्याचारी राजवटीपासून कायमची मुक्तता देऊ अशी गर्जना अमेरिकेने केली होती, मात्र इतकी वर्षे लढूनही अमेरिकेच्या हाती काहीच लागले नाही. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा खात्मा जरूर झाला, पण तालिबानचे समूळ उच्चाटन महासत्तेला करता आले नाही. उलट त्याच तालिबानच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढवली. महासत्तेची ही मोठी नाचक्कीच म्हटली पाहिजे.

तालिबानशी छेडलेल्या युद्धात अमेरिकेचे थोडेथोडके नव्हे, 146 लाख कोटी रुपये खर्च झाले. सुमारे 3 हजार अमेरिकन जवान अफगाणिस्तानात मृत्युमुखी पडले. आधी इराक आणि नंतर अफगाणिस्तानात पाठवलेल्या सैन्य तुकडय़ांतील अमेरिकी जवानांच्या मायदेशी दाखल होणाऱया शवपेटय़ांमुळे अमेरिकेत मोठा असंतोष निर्माण झाला होता. मागच्या वेळी अध्यक्षपदाची निवडणूक लढवतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात लढणाऱया सैनिकांना मायदेशी परत घेऊन येईन असा शब्द अमेरिकन जनतेला दिला होता. तो शब्द पूर्ण करतानाच तोंडावर आलेल्या निवडणुकीपूर्वी प्रे. ट्रम्प यांनी सैनिकी अस्मितेचे ट्रम्पकार्ड बाहेर काढले. तालिबानशी झालेला समझोता त्याचेच द्योतक आहे. 18 वर्षांच्या युद्धानंतर तालिबानच्या हाती देश सोपवून अफगाणिस्तानातून निमूटपणे माघार घ्यावी लागणे ही महासत्तेची मानहानी आहे. व्हिएतनामसारख्या चिमुकल्या देशाकडून झालेल्या पराभवाचीच ही पुनरावृत्ती आहे. अमेरिकेची अफगाणिस्तानातील माघार हिंदुस्थानसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पाकिस्तानच्या इशाऱयावर नाचणारे तालिबानी सत्तेत येणे हिंदुस्थानला परवडणारे नाही. अमेरिकेसोबतचे युद्ध संपल्यामुळे बेकार होणाऱया तालिबान्यांना जम्मू-कश्मीरात घुसवण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून होऊ शकतात. त्यामुळे युद्ध संपल्याच्या आनंदापेक्षा तहाच्या घडामोडी चिंताजनक आहेत. कधीकाळी हाच अफगाण संपूर्ण हिंदू होता. अखंड हिंदुस्थानचा भाग होता. महाभारतातील गांधार आणि गांधारी अफगाणिस्तानचीच. तेथील हिंदुकुश पर्वतही तीच साक्ष देतो. अखंड हिंदुस्थानच्या प्राचीन भागावर तालिबान्यांचा नव्याने होणारा कब्जा दुसरे महाभारत तर घडवणार नाही ना?

आपली प्रतिक्रिया द्या