सामनाचे पत्रकार राहूल डोल्हारे यांचे निधन

1343

दैनिक सामनाचे पत्रकार राहूल स्वामीदास डोल्हारे यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दहा दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल डोल्हारे हे मूळ शेलगाव ता. बदनापूर येथील होते. पूर्णा येथे शालेय शिक्षण पूर्ण करुन ते संभाजीनगरात आले. अत्यंत हलाखीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर एकमत,  देशोन्नती आदि दैनिकांत अनेक वर्षे त्यांनी काम केले. अतिशय दिलखुलास, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे राहूल डोल्हारे पत्रकारितेत सर्वपरिचित होते. दैनिक सामनाच्या संभाजीनगर येथील आवृत्तीत ते गेले सात वर्षापासून सेवारत होते. पत्रकार संघटनेच्या बांधणीतही ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने संभाजीनगरातील वृत्तपत्रसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या