आजचा अग्रलेख : सोलापुरात ऑनरकिलिंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढले असले तरी समाजाच्या डोळ्यांवरील जातीपातींची आणि खोट्या प्रतिष्ठेची झापडे तशीच आहेत. या फालतू प्रतिष्ठेपायी आणि खोट्या मानसन्मानासाठी देशभरातच ऑनरकिलिंगसारखे निर्घृण प्रकार सर्रास होत आहेत. दिल्लीतील ‘निर्भया’साठी देश अश्रू ढाळतो. संसद बंद पडते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, पण महाराष्ट्रातील बेटी ‘अनुराधा’ आई-बापाकडूनच मारली जाते. सोलापुरातील या ‘ऑनरकिलिंग’वर राज्यकर्ते व राजकारण्यांची पापणीही ओलवली जात नाही.  

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे आहे, पण सध्या ज्या घटना आपल्या आसपास घडताना दिसत आहेत त्या सर्व पुरोगामी व्यवस्थेस तडा देणार्‍या आहेत. ‘ऑनरकिलिंग’ हा भयंकर प्रकार महाराष्ट्रात घडत आहे व त्याकडे डोळेझाक करून सगळेच राजकीय लफडेबाजीत मश्गूल आहेत. संवेदना हरवलेल्या समाजात आपण सध्या जगत आहोत. सोलापुरात ‘ऑनरकिलिंग’ झाले. सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला म्हणून आई-वडिलांनीच 22 वर्षांची मुलगी अनुराधा विठ्ठल बिराजदार हिला निर्घृणपणे ठार मारले. ही मुलगी उच्चशिक्षित होती; पण तिने परजातीतल्या सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केल्याने कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, समाजात बदनामी झाली, असे अनुराधाच्या आई-वडिलांचे म्हणणे पडले. त्याच संतापातून त्यांनी अनुराधाची हत्या केली असेल तर हे सर्व प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे. मानवी हक्क व महिलांचे हक्क यावर बोलणारी तोंडे अशा वेळी गप्प होतात. दिल्लीतील आरुषी तलवार प्रकरणाचे गूढ अद्यापि कायम आहे. उत्तर प्रदेशातील विकास यादव या तरुणाने बहिणीच्या प्रियकरास निर्घृणपणे मारले. कोलकात्यातही एका उद्योगपतीने मुलीच्या प्रियकरास संपविण्याचे प्रकरण खळबळजनक होते. मध्यंतरी हैदराबादमधील ऑनरकिलिंगच्या प्रकाराने देशभरात खळबळ माजवली होती. मुलीने दुसर्‍या जातीच्या मुलासोबत विवाह केल्याने संतापलेल्या बापाने त्या मुलाची सुपारी देऊन हत्या केली. मुख्य म्हणजे हे

निर्घृण हत्याकांड

गर्भवती असलेल्या त्या मुलीसमोरच इस्पितळाबाहेर घडले. मुलीचे वडील तेथील मोठे व्यावसायिक आणि राजकीय प्रस्थ असल्याने मुलीच्या जातीबाहेरील प्रेमविवाहाने आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला. या संतापातून ही हत्या त्यांनी घडवून आणली. देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढले असले तरी समाजाच्या डोळ्यांवरील जातीपातींची आणि खोट्या प्रतिष्ठेची झापडे तशीच आहेत. या फालतू प्रतिष्ठेपायी आणि खोट्या मानसन्मानासाठी देशभरातच ऑनरकिलिंगसारखे निर्घृण प्रकार सर्रास होत आहेत. गंभीर म्हणजे आई-वडील, भाऊ, चुलते आदी रक्ताच्या नात्याची मंडळी आपल्याच मुला-मुलींच्या जीवावर उठलेली दिसून येतात. माणसाला जगण्याचा हक्क नाकारण्याचा हा प्रकार आहे. एका बाजूला न्यायालयाने ‘लफडेबाजीस’ म्हणजे विवाहबाह्य संबंधांना सरळसरळ मान्यता दिली आहे. पत्नी ही पतीची खासगी मालमत्ता नव्हे असे सांगत सर्वोच्च न्यायालय विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरविणारे कलम 493 रद्द करणारा निकाल देते आणि दुसरीकडे स्वेच्छेने प्रेमविवाह करून आनंदाने संसार करू इच्छिणार्‍या जोडप्यांना ना समाज जगू देतो ना त्यांची कुटुंबे. अशा जोडप्यांना मानसन्मान तर दूर, पण जगणेदेखील असह्य केले जाते. जात आणि धर्माची बंधने जशी त्यांच्या आड येतात तसा गरीब व श्रीमंतीचा भेदही येतो. हिंदी सिनेमाच्या पडद्यावर अशा प्रेमकथा रंगविल्या जातात. ‘सैराट’ या मराठी सिनेमाने अशाच प्रेमकथेवर 100 कोटींचा गल्ला केला, पण या

‘सैराट’चा शेवटही

‘ऑनरकिलिंग’चाच होता. ऑनरकिलिंग हा काही प्रतिष्ठेने मिरवायचा विषय नाही; पण आपल्या साहित्य, चित्रपट, नाटकांत, टी.व्ही. मालिकांतून विवाहबाह्य संबंध, ऑनरकिलिंगसारख्या विषयांना प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळत आहे तीसुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली. मुलींच्या भ्रूणहत्या रोखाव्यात यासाठी सरकार मोहिमा राबवते; पण स्त्रीभ्रूण वाचवून मुलींना वाढवायचे व शेवटी त्यांचे आई-बाप, भाऊच खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांच्या निर्घृण हत्या करणार असतील तर तुमच्या त्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’योजनेची वाट लागली असेच म्हणावे लागेल. सत्ताधारी पक्षाचे आमदार जाहीरपणे मुलीस पळवून आणू असे सांगतात व सरकार हे सर्व मख्खपणे सहन करते. कायदा अशा वेळी लाचार होतो. अशा राज्यात मुलींना प्रतिष्ठेचे जिणे मिळेल अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे. ही तथाकथित प्रतिष्ठा आता कागदोपत्रीच राहिली आहे. पुन्हा मुलींचा विनयभंग झाला, बलात्कार झाला की स्त्री अत्याचाराऐवजी अशा घटनांना जात-पात आणि धर्माची लेबले लावली जातात. पुरोगामित्वाचे सगळेच मुसळ महाराष्ट्रात अशा प्रकारे केरात गेले आहे. दिल्लीतील ‘निर्भया’साठी देश अश्रू ढाळतो. संसद बंद पडते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात; पण महाराष्ट्रातील बेटी ‘अनुराधा’ आई-बापाकडूनच मारली जाते. सोलापुरातील या ‘ऑनरकिलिंग’वर राज्यकर्ते व राजकारण्यांची पापणीही ओलवली जात नाही.