
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मोठी बंडखोरी उफाळून आली आहे. TMC च्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यापाठोपाठ लोकसभेतील 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी भाजप प्रणित NDA ला पाठिंबा देत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. तृणमूल काँग्रेसमधील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या निष्ठावंत खासदार सयानी घोष यांचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही भाजपवाल्यांपुढे झुकलात तर तुम्हाला सर डोक्यावर घेतील आणि झुकायला नकार दिला तर तुरुंगात टाकतील. हेच सत्य आहे. मी काही चुकीचे काम केले नाही. कधी हरामाचा एकही पैसा घेतलेला नाही. मी माझ्या वडीलांसोबत राहते. माझ्या आईचे व भावाचे निधन झालेय. माझं एक छोटसं घर आहे. मी लालची नाही. गाडी, बंगला हवा असा कुठलाही स्वार्थ माझ्यात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर भ्रष्टाचारी आहात, जर तुम्ही काही चुकीचं काम केलेलं आहे तर, भाजप तुम्हाला ब्लॅकमेल करू शकेल. पण जर तुमची नियत चांगली असेल तर, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात”, असे सयाना घोष म्हणाल्या होत्या. सयानी घोष यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बंडखोरांवर जोरदार टीका होता आहे.





























































