
टीम इंडियाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लाल्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ब्रायन लारा यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. हे दोन्ही महान फलंदाज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहेत. सचिन आणि लारा पुढील वर्षी होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये गोलंदाजांची धुलाई करताना दिसतील.
वर्ल्ड सीरीज टी-20 स्पर्धेमध्ये पाच देशांचे निवृत्त खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू आपला जलवा दाखवतील. या स्पर्धेचे आयोजन हिंदुस्थानमध्ये करण्यात आले असून पुढील वर्षी 2 ते 16 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संपन्न होईल. यात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विरेंद्र सेहवाह, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान, जॉन्टी रोड्ससह अनेक महान खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी मंजुरी दिली आहे. या स्पर्धेमुळे हिंदुस्थानमध्ये टी-20 क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढण्यास मदत होईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
दरम्यान, कारकिर्दीत एकूण 50 हजार धावा… 53 च्या सरासरीने 18 हजार कसोटी धावा… 51 कसोटी शतके… 49 एक दिवसीय शतके… अशी सचिनची कारकीर्द आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ क्रीडा चाहत्यांना मैदानाकडे खेचणारा सचिन पुन्हा एकदा बॅट हाती घेणार असल्याने या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.