
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी अर्जुनचे लग्न जमल्याचे समोर आले होते. मात्र याबाबत तेंडुलकर किंवा घई कुटुंबाकडून अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे अर्जुनचा साखरपुडा झाला की नाही? असा सवाल चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. आता सचिन तेंडुलकर यानेच याबाबत भाष्य केले असून अर्जुनचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा मुंबईतील कौटुंबिक कार्यक्रमात साखरपुडा पार पडल्याचे समोर आले होते. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील खास व्यक्ती आणि काही मोजके मित्रच उपस्थित होते. विशेष म्हणजे साखरपुड्याचा हा सोहळा अत्यंत गुप्तपणे पार पडला होता आणि याचे फोटो, व्हिडीओही समोर आले नव्हते. त्यामुळे अर्जुनचा साखरपुडा झाला की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. मात्र आता सचिनने याला दुजोरा दिला आहे. reddit वरील ‘आस्क मी एनीथिंग’ कार्यक्रमावेळी सचिनने याची अधिकृत घोषणाच केली.
reddit वरील कार्यक्रमामध्ये काही निवडक चाहत्यांना थेट सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. यावेळी एका चाहत्याने अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झालाय का? असा प्रश्न सचिनला विचारला. यावर सचिनने उत्तर दिले की, “हो, अर्जुनचा साखरपुडा पार पडला असून त्याच्या आयुष्यातील नवीन टप्प्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.” त्यामुळे अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाल्याचे स्पष्ट झाले असून आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, अर्जुन (वय – 25) आणि सानिया (वय – 26) यांचा 13 ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला. सानिया ही अर्जुनची बालपणीची मैत्री असून त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची ती नात असून तिने मुंबईतील कॅथेड्रन अँड जॉन कॉनन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तिने पदवी मिळवली. त्यानंतर ती मुंबईत परतली आणि प्रिमियम पाळीव प्राण्यांचे सलून, स्पा आणि स्टोअर मिस्टर पॉजची स्थापना केली.