सचिन, वीरूकडून साहाच्या खेळीचे कौतुक

महेंद्रसिंग धोनीमुळे झाकोळला गेलेला आणि कसोटीछाप यष्टिरक्षक फलंदाज असा शिक्का बसलेल्या वृद्धिमान साहाने आयपीएलमध्ये वादळी खेळी साकारून आपला दर्जा दाखवून दिला. 45 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारांसह 87 धावा फटकावणाऱया या खेळाडूचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनीही कौतुक केले.

सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहाने दिल्ली कॅ पिटल्सच्या बलाढय़ गोलंदाजी ताफ्यापुढे दे दणादण फलंदाजी केल्याने त्याच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन म्हणाला, साहाच्या फलंदाजीत प्रचंड सुधारणा बघायला मिळाली. त्याने चेंडूची उंची हेरून केलेली फटकेबाजी लाजबाब होती. ‘यही है राइट चॉइस बेबी, साहा’ अशा शब्दांत सेहवागने त्याच्या खेळीची स्तुती केली. ‘आपण फक्त कसोटी फलंदाज नाही हे साहाने सिद्ध केले. त्याची ही खेळी बघताना खूप मजा आली,’ अशी स्तुतिसुमने प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी उधळली.

बायकोने घेतली फिरकी

वृद्धिमान साहाच्या आक्रमक खेळीवर त्याची बायको रोमी मित्रा ही जाम फिदा झाली. मग आपल्या पतीची फिरकी घेण्याचा मोह तिलाही आवरता आला नाही. रोमीने इन्स्टाग्रामवर ‘वृद्धी, पटकन सांग, लंचमध्ये काय खाल्ल होतंस रे,’ अशी विनोदी पोस्ट टापून नवऱयाच्या खेळीचे कौतुक केले.

‘साहाने आज जबरदस्त फलंदाजी केली. तो एक धोकादायक खेळाडू आहे याची मला कल्पना होती, मात्र पुनरागमन करताना त्याने केलेली फटकेबाजी बघून मी अचंबित झालो. क्रिकेटवरील साहाची श्रद्धा त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी ठरवते.’
– रिकी पॉँटिंग (प्रशिक्षक, दिल्ली कॅपिटल्स)

आपली प्रतिक्रिया द्या