
नवीन वर्षात महाराष्ट्र पोलीस दलात मोठा बदल होत आहे. NIAचे माजी प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शनिवारी म्हणजे ३ जानेवारीला सदानंद दाते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सध्या पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ ला संपत आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असणार आहे. सदानंद दाते यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक होते. दाते यांना काही दिवसांपूर्वीच NIAच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. दाते यांची NIAमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ते सीबीआयचे उपमहानिरीक्षक होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते. तसेच मुंबईत कायदा-सुव्यवस्था विभागाचे ते सहआयुक्त होते. मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये ते पोलीस आयुक्त होते.

























































