स्थळ – षण्मुखानंद सभागृह
वेळ – दुपारी 3 वाजता
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीने सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून देण्याचा संकल्प या मेळाव्यानिमित्त केला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात दुपारी 3 वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड आणि विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीची बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठकही उद्या होण्याची शक्यता आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उद्या मुंबईत येणार आहेत. या बैठकीत त्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा होईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील जागावाटप व अन्य तयारीप्रमाणेच मुख्यमंत्रिपदाबाबतही उद्या चर्चा होईल, अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांना दिली होती.