
मुंबईतील चेंबूर येथील सुभाषनगर परिसरात एका पुनर्विकासाधीन इमारतीचे काम सुरू असताना भीषण अपघात झाला आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची भीषण घटना समोर आली आहे. या अपघातात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगरमधील इमारत क्रमांक 36 च्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू होते. शुक्रवारी हे सहा कामगार सहाव्या मजल्यावर विटा रचण्याचे काम करत होते. मात्र, काम सुरू असताना या कामगारांनी कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट किंवा सुरक्षा साधनांचा वापर केला नव्हता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावेळी हे सहा कामगार थेट सहाव्या मजल्यावरून खाली कोसळले. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून इतर 5 जणांवर सध्या राजावडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच चेंबूर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईत वाढत्या बांधकामांसोबतच कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

























































