उच्च्यशिक्षित साईभक्ताचा जिवंतपणीच किडनी दानाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिर्डी

साईबाबांवरील आपल्या श्रद्धेपोटी अनेकांना आपण रोख रक्कम, सोने, चांदी, हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तू साईचरणी अर्पण करताना पाहिलं असेल, मात्र मुळच्या चेन्नई येथील साईभक्त शिवप्रिया कौशिक यांनी एखाद्या रुग्णाला जिवंतपणीच स्वतःची किडनी दानाचा निर्णय घेतला आहे.

साईबाबांना सर्वस्व मानणाऱ्या ३४ वर्षीय शिवप्रिया मुळच्या चेन्नईच्या असुन त्या पुण्यातल्या टाटा मोटर्स मध्ये संशोधन विभागात मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. शिवप्रिया यांनी गेल्या आठ वर्षात साडे तीनशेहून अधिक वेळा साईदर्शनासाठी शिर्डीला भेट दिली आहे. तिसहून अधिक वेळा संस्थान रक्तपेढीत त्यांनी रक्तदान केले आहे. अनेक साईभक्त साईबाबांच्या चरणी सोने,चांदी,वस्तू , रोकड स्वरूपात दान करत असताना शिवप्रिया यांनी, साई समाधी शताब्दी निमित्त आपली ओ रक्तगट असलेली किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातुन अनेकांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे.

आपण गरजू रूग्णाला किडनी दान करण्याचा निश्चय शिवप्रिया यांना केला आहे. ज्या व्यक्तीवर त्याचे कुटूंब अवलंबुन असेल किंवा ती व्यक्ती शिक्षण घेत असावी, अशा व्यक्तीलाच आपण तात्काळ किडनी देणार असल्याचे शिवप्रिया यांनी सांगितले आहे. तसंच मृत्यूनंतर नेत्रदान, शरीरदान करण्याच्या दृष्टीनेही  शिवप्रिया यांनी आवश्यक त्या बाबींची पुर्तता केली आहे. मात्र जिवंतपणी किडणी दान करून एखाद्याला नवीन आयुष्य देण्याच्या शिवप्रिया यांच्या अनोख्या निर्णयाचे सर्व स्थरातून कौतुक केलं जात आहे.