तेलंगणातील साईभक्तांच्या मोटारीचा टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभी करून पाहणी करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या लक्झरी बसने मोटारीला धडक दिल्याने दोघे ठार झाले. शनिवारी मध्यरात्री सोलापूर-पुणे महामार्गावर अरण हद्दीतील यशवंत हॉटेलसमोर अपघात झाला. अपघातानंतर चालकाने बस न थांबविता तो निघून गेला.
तुरलापाटी नवीनकुमार सांबा सदाशिवराव (वय 40), कारचालक मोहम्मद रहेमत मोहम्मद इब्राहिम (वय 32, दोघेही रा. सिकंदराबाद, तेलंगणा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
कारमधील कुटुंब हे तेलंगणा राज्यातील असून, पती-पत्नी, मुलगी, जावई व नातू असे सर्वजण सिकंदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी निघाले होते. या अपघातात जावई जागीच ठार झाले, तर कारचालक उपचारापूर्वीच मयत झाला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात स्वामी ट्रव्हल्सच्या बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाटस (जि. पुणे) येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी व्यंकटरमण्णा नागभूषणराव अकिनाप्रगडा (वय 65, रा. रामपल्ली, ता. मेडचल, जि. मलकाजगिरी, तेलंगणा) हे पत्नी सीता भुवनेश्वरी, जावई नवीनकुमार, मुलगी दीप्ती, नात रित्वुका, नातू शान्विक असे सर्वजण मोटारीने सिकंदराबादहून शिर्डीला दर्शनासाठी चालले होते. शनिवारी मध्यरात्री सोलापूर-पुणे महामार्गावरील अरण गावच्या हद्दीतील यशवंत हॉटेलसमोर त्यांची मोटार आली असता पाठीमागील टायर फुटल्याने मोटार महामार्गाच्या कडेला थांबवली. यावेळी कारचालक मोहम्मद रहेमत मोहम्मद इब्राहिम व जावई नवीनकुमार हे खाली उतरून पाहत असताना सोलापूरहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱया लक्झरी बसने दोघांना धडक दिली. यात नवीनकुमार याचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक मोहम्मद इब्राहिम गंभीर जखमी झाला. वरवडे टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी सोलापूरला हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, मोडनिंब दूरक्षेत्रचे हवालदार गणेश जगताप, सहायक फौजदार धनाजी माळी, चालक नितीन डाकवाले घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातानंतर निघून गेलेल्या लक्झरी बसविषयी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेऊन त्याची माहिती पुणे पोलिसांना दिली. पहाटे पाटस (जि. पुणे) येथील टोलनाक्यावर लक्झरी बसचालक संभाजी माणिक बिराजदार (वय 55, रा. बलसूर, ता. उमरगा जि. धाराशिव) व लक्झरी बस हवालदार गणेश जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चिमुकल्या रित्वुकाने दिला आईला धीर
नवीनकुमार हे सिकंदराबाद येथे स्थापत्य अभियंता असून, स्वतःच्या मोटारीतून पत्नी दीप्ती, मुलगी रित्वुका, मुलगा शान्विक व सासू-सासरे यांना घेऊन साई दर्शनासाठी जात होते. लक्झरी बसने धडक दिल्याने नवीनकुमार जागीच ठार झाले. यावेळी सहा वर्षांच्या रित्वुका ही आईला धीर देत होती. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.