सायना, प्रणॉय थायलंड स्पर्धेत खेळणार; एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हही

कोरोनाच्या संकटामुळे 10 महिन्यांपासून बंद पडलेल्या बॅडिंमटन स्पर्धांना थायलंड खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने मंगळवारपासून प्रारंभ झाला. मात्र थायलंड स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या मेडिकल टीमकडून अक्षम्य चूक पहिल्याच दिवशी घडून आली. सायना नेहवाल व एच एस प्रणॉय या दोघांना तिसऱया टेस्टनंतर कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट मेडिकल टीमकडून देण्यात आला. तसेच सायना नेहवालच्या संपर्कात आल्यामुळे पारूपल्ली कश्यपलाही विलगीकरणात ठेवण्यात आले. पण याच टीमने संध्याकाळी सायना नेहवाल व एच एस प्रणॉय यांचा चौथ्या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट केले आणि स्पर्धेत खेळण्याचीही परवानगी दिली. सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट एकाच दिवशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आला. यावरून आता मेडिकल टीमवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान हिंदुस्थानचे हे दोन्ही खेळाडू बुधवारी सलामीची लढत खेळणार आहेत अशी माहिती पुढे आली आहे.

सिंधू, साई प्रणीत सलामीलाच गारद

पी. व्ही. सिंधूव बी. साई प्रणीत या हिंदुस्थानच्या स्टार खेळाडूंना थायलंड खुल्या बॅडिंमटन स्पर्धेत सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. सहाव्या मानांकित सिंधूला चुरशीच्या लढतीत 18 व्या मानांकित डेन्मार्पच्या मिया ब्लिचकेल्ट हिने 16-21, 26-24, 21-13 असे हरविले. पुरुष एकेरीत 13 व्या मानांकित बी. साई प्रणीतला 15 व्या मानांकित थायलंडच्या वैंतापह्न वांगचेरोन याने 21-16, 21-10 असे पराभूत केले. सात्त्विक साईराज रेंकीरेड्डी व अश्विनी पोनप्पा या हिंदुस्थाननी जोडीने मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली.

श्रीकांतच्या नाकातून आले रक्त

किदाम्बी श्रीकांत यानेही कोरोना चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या मेडिकल टीमच्या कामावर नाराजी व्यक्त केली. कोरोना चाचणी करताना किदाम्बी श्रीकांतच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्याने नाकातून रक्त येत असलेला फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. एकूणच काय तर थायलंडमधील मेडिकल टीमच्या कामावर यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या