मंत्रालयातून गाडगेबाबांची दशसूत्री हटवली

>>राजेश चुरी 

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर झळकणारी संत गाडगेबाबा यांची ‘दशसूत्री’ हटवण्याचे काम ‘ईडी’ सरकारने केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. गाडगेबाबांची ही दशसूत्री म्हणजे जनताभिमूख कारभाराचा वाटाडय़ाच आहे. मात्र ईडी सरकारने ही दशसूत्रीच हटवून आपला कारभार कसा चालणार हेच दाखवून दिल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार महाविकास आघाडी सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या  हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार संत गाडगेबाबा यांची दशसूत्री संगमरवरी फलकात कोरण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी या दशसूत्रीच्या फलकाचे समारंभपूर्वक अनावरण केले होते. संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार महाविकास आघाडी सरकार काम करेल, असा निर्धार त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दोन-अडीच वर्षे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील ही दशसूत्री महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आणि मंत्रालयात येणाऱयांना प्रेरणा देत होती.

या पाटीवर संत गाडगेबाबांची दशसूत्री आणि त्याखाली गाडगेबाबांच्या या शिकवणीनुसार आमचे शासन काम करणार आहे असे वचन आणि त्याखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे नमूद केले होते. पण महाविकास आघाडी सरकारला हटवल्यानंतर नव्या सरकारने संत गाडगेबाबांचे विचारही मंत्रालयातून हटवल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱयाने सांगितले.

दशसूत्रीत काय आहे

भ्भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघडय़ानागडय़ांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणाकासाठी मदत, बेघरांना निवारा, आश्रय, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी निराशांना हिंमत.