प्रासंगिक – संत पाचलेगांवकर महाराजांचे लोकोत्तर कार्य

>> चंद्रशेखर कमळाकर दाभोळकर

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती।
देह झिजविती उपकारे।।

संतांचे हे मुख्य लक्षण! आचरणातून मानवी मूल्यांच्या केलेल्या विचारांच्या आदर्शामुळे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले. जगाच्या कल्याणासाठी विधात्याने संतांना इहलोकी पाठविलेलं असतं असा मानवी मनाचा दृढ विश्वास आहे. आसक्ती नसलेला मानवरूपी देव लोकोद्धारासाठी झटतो याचं उदाहरण म्हणजे आपली संतपरंपरा! संस्कृतीला कळस चढविण्याचे काम संतांनी केले आहे. निजामाच्या काळापासून संत पाचलेगांवकर महाराज यांनी श्रमदान, रक्तदान यांसारखे महायज्ञ तसेच अनाथाश्रम, महिलाश्रम, बालकाश्रम स्थापन करून लोकोद्धारासाठी कार्य केले. त्यांनी आखून दिलेल्या सामुदायिक उपासनेच्या माध्यमातून देशभरातील विविध मुक्तेश्वर आश्रमांत त्यांचे कार्य त्यांच्या शिष्यगणांकडून सुरू आहे. हिंदू धर्म प्रचारासाठी तसेच लोककार्यासाठी त्यांनी समर्थ रामदास स्वामींसारखा सतत देशभर संचार केला. संत पाचलेगांवकर महाराजांनी सुरू केलेल्या चिन्मय पादुका महोत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. गेली पन्नास वर्षे अखंड अविरत श्री दत्तात्रेय व श्रींच्या प्रतिमेच्या पालखीची भव्य मिरवणूक काढली जाते.

परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या लहानशा खेडेगावात जन्मलेल्या नारसिंह म्हणजेच महाराजांनी बालवयातच सर्पाबरोबर खेळायला सुरुवात केली. माधवाश्रम स्वामी यांनी या दिव्य बालकाच्या अंगी असलेले सिद्धयोगीपण ओळखले आणि संसारापासून हे बालक अलिप्त राहून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आपले योगदान देत लोकांना उपासना आणि भक्तिमार्ग शिकवेल असे भाकीत केले. त्यांनीच या दिव्य बालकाचे नाव ‘संचारेश्वर’ असे ठेवले. बाळाच्या रूपात घरात साक्षात परब्रह्म अवतरले होते. वेगवेगळ्या लीला त्यांनी दाखवायला सुरुवात केली व या जगावेगळय़ा सात वर्षीय मुलाला सारेजण ’बाबा’ म्हणून ओळखू लागले. दणकट बांधा, पाणीदार डोळय़ांसह प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा असे महाराज अंगावर कुठलेही वस्त्र परिधान न करता कमरेला फक्त लंगोटी आणि संपूर्ण देहाला विभूती फासून सोबत नाग घेऊन फिरायचे .तल्लख बुद्धी, प्रभावी वक्तृत्व लाभलेल्या या देवरूपी व्यक्तीची लोकांना प्रचीती यायला लागली व दूरदूरहून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले आणि भंडारा घालू लागले.

वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी अवतार संपवण्यापूर्वी स्वतःकडील मुक्तेश्वराची पंचधातूची हिंगोलीच्या व्यापाऱयाकरवी महाराजांना दिलेली मूर्ती आता बुलढाणा जिह्यातील खामगावच्या मुख्य आश्रमात आहे. गावाबाहेरच्या एका डोंगरातल्या गुहेतून दत्तानंद स्वामींची स्मरणी (जपाची माळ), भस्म आणि लिखाणवही या तीन वस्तू मिळाल्याबरोबर नारसिंहाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या आणि त्याला आपल्या अवतारकार्याची जाणीव झाली. सर्व ठिकाणी भटकत असताना दुःख, दैन्य आणि अज्ञान यात भरडून निघणारे आपले देशबांधव पाहून त्यांच्या देशकार्याला झोकून देण्याच्या निश्चयाची धार आणखी वाढली. देश आणि देशबांधव यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढनिश्चय करून महाराज शिवासमोर नतमस्तक झाले आणि देशहित हा एकच विचार रात्रंदिवस करू लागले व धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशोन्नतीसाठी, अन्यायाचा प्रतिकार करून न्यायाचे रक्षण करणारी ताकद लोकांमध्ये निर्माण करत त्यांच्यात जनजागृती करणे, ही शक्ती बलवान करून राष्ट्रकार्यासाठी कर्तृत्ववान बनवण्याचे महत्त्व त्यांनी ओळखले. महाराजांनी मुत्तेश्वर दलाची स्थापना केली व हे दल पुढे ’तरुण सभे’त विलीन केले. सावरकरांची व्याख्याने आयोजित केल्यामुळे व त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनी महाराजांच्या अटकेचे वॉरंट काढले. नंतर भूमिगत राहून महाराजांनी भारत भ्रमण केले. महाराजांनी हिंदूं धर्म रक्षणासाठी मोठे कार्य केले. ख्रिस्ती व मुस्लिम धर्मांतरास विरोध केला. हिंदू महासभा, हिंदुराष्ट्र सेना यांची स्थापना केली.हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रचार, प्रसार त्यांनी केला. आजही त्यांनी दिलेल्या शिकवणीची जपणूक त्यांचा अनुग्रह घेतलेले लाखो शिष्यगण उपासनेच्या माध्यमातून करत आहेत. देशभरातील त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमात या उपासना शिस्तबद्धतेने होतात. प्रसिद्धीपासून सदैव चार हात लांब राहणाऱया पाचलेगांवकर महाराजांनी केलेल्या लोकोपयोगी, परोपकारी कार्याचा आजही ठळकपणे उल्लेख केला जातो हीच त्यांच्या श्रमतपस्येची महती आहे.