
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एक विरंगुळ्याचा दिवस प्रत्येक महिलेला हवा असतो, मग ती गृहिणी असेल वा नोकरी करून घर सांभाळणारी महिला. संक्रांत सोहळ्याच्या निमित्ताने असाच एक खास दिवस महिलांना अनुभवता येणार आहे. मुंबई आणि ठाणे जिह्यात सहा ठिकाणी येत्या 17 जानेवारीपासून संक्रांत सोहळा सुरू होणार आहे. यातून हळदीकुंकू समारंभासह व्यक्तिमत्त्व खुलवण्याची संधी महिलांना मिळणार आहे. दैनिक ‘सामना’ संक्रांत सोहळ्याचे माध्यम प्रायोजक आहे.
महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशनच्या वतीने ‘संक्रांत सोहळा 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये धम्माल खेळ, प्रश्नोत्तरे आणि व्यक्तिमत्त्व स्पर्धेचा समावेश आहे. प्रत्येक सेंटरवरून पाच महिलांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाईल. प्रत्येक सेंटरवरून निवडून आलेल्या 30 जणींमध्ये अंतिम फेरी रंगेल. 30 जणींपैकी तीन महिला सोहळ्याच्या विजेत्या ठरतील. तिघींपैकी पहिली विजेती ‘संक्रांत सोहळा क्वीन’ हा बहुमान पटकावेल. तसेच मानाची पैठणी आणि लडाख टूर जिंकेल. महाअंतिम फेरीआधी निवडून आलेल्या 30 महिलांचे ग्रुमिंग सेशन होणार आहे. या सेशनमध्ये महिलांना आपले व्यक्तिमत्त्व खुलवण्याच्या दृष्टीने टिप्स दिल्या जातील. प्रत्येक सेंटरवर महिलांना संक्रांतीचे वाण तसेच आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स, बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.
संक्रांत सोहळ्याच्या प्राथमिक फेर्या दक्षिण मुंबई, लालबाग, कल्याण, ठाणे, डोंबिवली, वाकोला- अंधेरी येथे पार पडणार आहेत. या सेंटर्सविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नावनोंदणीसाठी 9930115759 या क्रमांकावर संपर्क साधावा.























































