
>> दिलीप ठाकूर
मल्टिप्लेक्स, ओटीटी आणि समाज माध्यम (सोशल मीडिया) या गोष्टी रुजत जाताना जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट अन्य भाषिक चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचले, त्यातील अनेक कलाकार ज्ञात होत गेले. सलीम कुमार हा मल्याळम भाषेतील चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक याच गोष्टींमुळे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि कोची येथे त्याचे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी निधन झाल्याच्या वृत्ताने सगळेच हळहळले.
‘हेराफेरी’, ‘भुलभुलैया’ या हिंदी चित्रपटांतही त्याच्या भूमिका आहेत. तो केरळ राज्यातील मल्याळम भाषेतील चित्रपटाचा लोकप्रिय कलाकार. त्याचा जन्म एर्नाकुलम जिल्ह्यातील उत्तर परावूर येथील चित्रहुकरा या गावातील. त्याचे मूळ नाव सहोडारम अय्याप्पन. चित्रपटांत काम करू लागल्यावर त्याने सलीम नाव धारण केले, पण तेवढेच उपयुक्त नाही असे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्याने ‘सलीम कुमार’ असे केले. लहानपणापासूनच हसत खेळत त्याला विनोद करण्याची सवय म्हणून गावात त्याचे घर ‘लाफिंग व्हिला’ म्हणून ओळखले जाई. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तो मिमिक्री करू लागला. ‘कोमिकोला ब्रॉडकास्ट शो’मुळे तो लोकप्रिय झाला. ‘शट्टमनुरुवट्टम’ ( 1997) या चित्रपटापासून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि जवळपास तीस वर्षे यशस्वी वाटचाल करीत मल्याळम चित्रपटसृष्टीत आपली एक वैशिष्टय़पूर्ण ओळख निर्माण केली. असे असले तरी पहिल्या चित्रपटातील त्याची भूमिका पाहून त्याला अजिबात अभिनय येत नाही असेच तत्कालिक चित्रपट समीक्षकांनी आणि चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी म्हटले होते.
त्यावर मात करण्यासाठी सलीम कुमारने भरपूर मेहनत घेतली आणि दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील अधिकाधिक चित्रपट मनोरंजन वाहिनीवर पाहिले. त्याने अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी विनोदी अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली ‘अचानुरगथा वीडू’ या चित्रपटातील बहुरंगी अभिनयासाठी. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण ठरला. विनोदी भूमिका ते वाढत्या वयाबरोबर चरित्र भूमिका अशी त्याची वाटचाल झाली.
अभिनयाप्रमाणेच त्याने ‘कम्पार्टमेट’, ‘करुथा जोथन’ अशा मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. त्याने भूमिका साकारलेल्या ‘सत्यमेव जयते’, ‘वन मॅन शो’, तर ‘परक्कुम थालिका’, ‘मिसा माधवन’, ‘कुन्जिकम कल्याणरमण’, ‘सीआयडी मुसा’ अशा अनेक मल्याळम भाषेतील चित्रपटांत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यातील काही मसालेदार मनोरंजक चित्रपट ओटीटीवर येताच अन्य भाषिक रसिकांना ते पाहता आले. आपल्या जवळच्या मित्रपरिवारात ते ‘सलीम अट्टा’ या नावाने ओळखले जात. त्याने काही केरळ राज्य चित्रपट पुरस्कारही प्राप्त केले. मल्याळम भाषेतील चित्रपटसृष्टीतीच्या वाटचालीतील एक उत्तम कलाकार म्हणून ओळख निर्माण केली ही त्याची मोठीच मिळकत.

























































