केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, मग अरबी समुद्रातील शिवस्मारक अद्याप का झाले नाही? सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला, छत्रपतींचा का नाही, असा संतप्त सवाल आज संभाजीराजे छत्रपती यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राजकारणात चांगल्यासाठी वापरा, खेळ करू नका असे बजावतानाच, येत्या निवडणुकीमध्ये महाराजांचे नाव वापरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यासाठी जलपूजनही करण्यात आले, मात्र आठ वर्षे उलटली तरी अद्याप स्मारकाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यावरून स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ते मुंबईत दाखल झाले.
गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेजवळ जाण्यासाठी रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी संभाजीराजे यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना पकडून गाडीत काsंबले. त्यावर संभाजीराजे संतापले. आपले कार्यकर्ते काही आरोपी नाहीत, आधी त्यांना खाली उतरवा, असे त्यांनी पोलीस उपायुक्त मुंडे यांना बजावले. मुंडे यांनी संभाजीराजे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना 50 कार्यकर्त्यांसह समुद्रात जाण्याची परवानगी दिली. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन सरकारने शिवस्मारकाची घोषणा केली होती. प्रत्येक सरकार म्हणतेय की पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. सरकार थेट पंतप्रधानांना बोलावून जलपूजन करते. आता अशी तक्रार करून चालणार नाही, असे संभाजीराजे म्हणाले. स्मारकासाठी जलपूजन केल्याची जागा सापडत नाही म्हणजे पूर्णपणे जनतेला फसवण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 2016 मध्ये स्मारकासाठी जलपूजन झाले आणि त्यासाठी एक समितीही स्थापन झाली होती, मग पुढे काय झालं? अशीही विचारणा त्यांनी केली.
मोदींनी जलपूजन केले ती जागा सापडलीच नाही!
संभाजीराजे बोटीतून शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेकडे गेले. मात्र त्यांना स्मारकाची जागाच दिसली नाही, असे त्यांनी परतल्यानंतर सांगितले. ते म्हणाले की, ‘बोटीतून मी दुर्बिणीने अरबी समुद्रात स्मारकाची जागा शोधत होतो, पण मला कुठेही दिसली नाही. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का असे बोटवाल्याला विचारल्यावर परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन तास फिरलो, पण मोदींनी जलपूजन केलेली जागा कुठेही दिसली नाही,’ असे संभाजीराजे म्हणाले.