आधार यंत्रणेत सावळागोंधळ: दोघांच्या आधार कार्डवर एकसारखा क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कळवण

शासनाने अनेक ठिकाणी आधार कार्डची सक्ती केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आधार क्रमांक मिळत असल्याने तो क्रमांकच त्या व्यक्तीची ओळख ठरत आहे. मात्र कळवण तालुक्यातील कुंडाण येथील वेदांत हिरामण देवरे व उत्तम शिवाजी पवार या दोघांच्या आधार कार्डवर एकसारखा क्रमांक असल्याने दोघांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दोघांच्या बँक व्यवहाराला तसेच इतर शासकीय कामांना एकच आधार क्रमांक अडथळा ठरत असून आधार यंत्रणेच्या या प्रतापामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पवार यांनी आधी आधार कार्ड काढले असून देवरे यांचे आधार कार्ड नंतरचे आहे. मात्र आधार यंत्रणेकडून पवार यांना नवीन कार्ड काढण्याचा सल्ला दिला गेला. आश्चर्य म्हणजे पॅनकार्डची आदलाबदली करण्याचा सल्लाही दिला गेल्याचे त्यांनी सांगीतले. वारंवार यासंबंधी तक्रार देऊनही आधार यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवार व देवरे यांनी केला आहे. यासंबंधी पवार व देवरे यांनी हेल्पलाईनवर वेळोवेळी संवाद साधला असुन यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारची ठोस माहिती त्यांना दिली जात नसल्याने दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

दरम्यान, शासकीय कामांसाठी आधारची सक्ती करणाऱ्या शासनाने आधी यंत्रणेतील दोष दूर करून सेवेत पारदर्शकता आणून नंतर जनतेला सक्ती करण्याची गरज असून आधार कार्ड वरील चुका दुरुस्त करण्यासही विलंब लागत असल्याने सर्वसामान्यांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने आधार संबंधी तक्रारींची तत्काळ सोडवणूक न करणाऱ्या संबंधित घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

गलथान कारभाराचा मनस्ताप
आधार कार्डवरील सारख्या क्रमांकामुळे कुठलेही काम होत नाही. प्रत्येक वेळी स्टँम्प करून सादर करावा लागतो. स्टँम्प साठी आत्तापर्यंत हजारो रुपये खर्च झाले आहेत. नवीन आधार कार्ड काढण्याचा सल्ला देऊन यंत्रणा मोकळी होते. आधार यंत्रणेच्या अशा गलथान कारभारामुळे प्रचंड मनस्ताप होत आहे.- उत्तम पवार, कुंडाणे, ता. कळवण

यंत्रणेच्या चुकीची शिक्षा
मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून कागदपत्रांच्या पूर्ततेवेळी व बँकेत काही काम असेल तर आधार कार्डच्या क्रमांकामुळे ते होत नाही. शिष्यवृत्तीही रखडते. यंत्रणेच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागत असून यावर लवकर तोडगा काढावा.- वेदांत देवरे, कुंडाणे ता. कळवण