चित्रपटसृष्टीला रामराम ठोकणाऱ्या अभिनेत्रीने मौलवीसोबत केला निकाह

हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या सना खान हिने अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेतला होता. तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत याबाबत जाहीर केले होते. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की मालिका आणि चित्रपटात काम केल्याने तिला पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळाले. मात्र या जगात जन्म घेणाऱ्याचे फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणे हे एकच ध्येय आहे का ? असा प्रश्न गेले काही दिवस आपल्याला सतावत होता, ज्यामुळे आपण अभिनय सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सना हिने म्हटले होते.

सनाने इस्लामसाठी अभिनय सोडल्यानंतर आता तिने एका मौलवीसोबत निकाह केला आहे. तिच्या निकाहाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुफ्ती अनस सय्यद असे त्या मौलवींचे नाव असून ते गुजरातमधील रहिवासी आहेत. सना व अनस हे 20 नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले असून सनाने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यात सनाने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे.

सना ही काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकराबाबत केलेल्या विधानांमुळे प्रकाशझोतात आली होती. तिचा प्रियकर नृत्यदिग्दर्शक मेलविन लुईस याने आपल्याला फसवले असल्याचे सनाने म्हटले होते. त्याचे अनेक तरुणींशी प्रेमसंबंध असल्याचं तिने म्हटलं होतं. आपण प्रियकरावर आंधळं प्रेम केलं, मात्र त्याने आपल्याला फसवलं असं तिने म्हटलं होतं. प्रेमात पडल्यानंतर जवळपास वर्षभराने आपल्याला मेलविनचे खरे रुप दिसल्याचे तिचे म्हणणे आहे. सनाने आतापर्यंत 15 चित्रपटांमध्ये काम केले असून ती सलमान खान याची मुख्य भूमिका असलेल्या ‘जय हो’ मध्ये पण दिसली होती. ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या