श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांना श्रीलंकन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कार्यकारी समितीने आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरून ही घोषणा केली.
श्रीलंकेचे हंगामी प्रशिक्षक असलेल्या 55 वर्षीय जयसूर्याला हिंदुस्थान, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका संघाने केलेल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. श्रीलंकेने सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर क्लीन स्वीप केले होते. संघाने तिसर्या कसोटीत इंग्लंडचा ८ विकेटनी पराभव केला होता. याआधी, श्रीलंका संघाने हिंदुस्थानविरुद्धच्या वनडे मालिकेत २-० फरकाने बाजी मारली होती. जयसूर्याला सप्टेंबर महिन्यात श्रीलंका संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. आता त्यांच्याकडे ३१ मार्च २०२६पर्यंत श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षकपद असेल.
वर्ल्ड कपनंतर सिल्व्हरवूडने सोडले होते पद
सिल्व्हरवूड यांच्या राजीनाम्यानंतर सनथ जयसूर्याला हंगामी प्रशिक्षक बनवण्यात आले होते. टी-२० क्रिकेट वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर सिल्व्हरवुडने श्रीलंका संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते. वानिंदू हसरंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्या फेरीतच बाद झाला होता.