वाळूतस्करांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम, वाळूचोर बंधूंना अटक

सामना प्रतिनिधी । संगमनेर

घारगाव पोलिसांनी वाळूतस्करांविरोधात सुरु केलेली मोहीम कायम असून पठारावरील कौठे शिवारातील मुळा नदीपात्रात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. विलास शिवाजी रंधे (वय 35) व कैलास शिवाजी रंधे (वय 40, दोघेही रा.पिंपळदरी, ता.अकोले) अशी अटक केलेल्या दोन वाळूचोर बंधूंची नावे आहेत.

गुरुवारी कौठे शिवारातील कारवाडी येथील उत्तम रामदास ढोकरे या शेतकर्‍याच्या विहीरीलगत दोन ट्रॅक्टरमधून वाळू उपसा सुरु असल्याची खबर पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना समजली. त्यानी तात्काळ आपल्या पथकाला तेथे छापा घालण्याचे आदेश दिले. पोलिसांनी चोहोबाजूंनी घेराव घालीत ‘त्या’ विहिरीजवळ छापा घातला असता एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर एकूण दोन ट्रॅक्टर व त्यालगत दोघेजण वाळू भरताना आढळून आले. त्यांच्या जागेवरच मुसक्या आवळीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व जप्त केलेल्या मुद्देमालासह घारगाव पोलीस ठाणे गाठले.