कल्याणच्या रेतीबंदरवर वाळूमाफियांचा दरोडा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलखोल

कल्याणच्या रेतीबंदरवर वाळूमाफियांचा भरदिवसा दरोडा पडत असल्याचा धक्कादायक प्रकास उघडकीस आला आहे. रात्रीच्या अंधारात चोरीछुपे सुरू असलेली रेती उपसा आता खुलेआम दिवसाढवळ्या सुरू असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सक्शन पंप लावून रेती उपसा सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तहसील प्रशासनाने रेती उपसा बंद असल्याचा दावा केला असला तरी या व्हिडीओमुळे महसूल विभागाची पोलखोल झाली आहे.

कल्याण रेतीबंदर परिसरात अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीरपणे रेती उपसा सुरू आहे. न्यायालयाने राज्यभरातील रेती उत्खननावर कठोर निर्बंध लावून अनधिकृत उत्खनन बंदीचे आदेश लागू केले आहेत. तरीही कल्याण रेतीबंदर आणि दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात खाडीतून खुलेआम रेती उपसली जात आहे. रेतीमाफियांच्या बोटींची खाडीत सतत ये-जा सुरू आहे. सक्शन पंपद्वारे खाडीतील रेती खरवडून काढून ती खाडीच्या काठावर ठेवली जाते. त्यानंतर मोठ्या ट्रकमधून ही रेती शहरात पोहोचवली जाते.

कठोर कारवाई करा !
पाच-सहा महिन्यांतून एकदा महसूल प्रशासन कारवाई करते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच रेती उपसा पुन्हा सुरू होतो. महसूल विभागाच्या या दिखाऊ कारवाईमुळे संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सुरू असलेला हा उपसा थांबवून वाळूमाफियांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.