
चंद्रपूरातील पोंभुर्णा तालुक्यातील देवाळा बुज येथे शुक्रवारी रात्री अवैध वाळू वाहतुक गस्ती भरारी पथक वाहनावर एका ट्रॅक्टरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ट्रॅक्टरने पथकाचे वाहन चिरडले आहे. या हल्ल्यात पथकाच्या वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. पथकातील सर्व सदस्य सुखरुप असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गौण खनिजाची लूट करणाऱ्यांवर गस्ती पथक कारवाई करते. पथकातील अधिकाऱ्यांनी गस्तीवर असताना पोलीस संरक्षण घेऊन जाणे अपेक्षित असते. मात्र, हे पथक पोलीस संरक्षण न घेता गेल्याने हा हल्ला झाला आहे. तसेच गस्तीवर असताना शासकीय वाहनाचा वापर करणे गरजेचे आहे. वाळू तस्करांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.























































