संदीप गडोली ‘फेक एन्काऊंटर’ प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

अंधेरी येथे दहा वर्षांपूर्वी संदीप गडोली फेक एन्काऊंटर प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने हरयाणातील पोलिसांसह अन्य दोघांना दिलासा दिला आहे. तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे ‘हत्या’ आणि ‘कट’ सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांनी 5 पोलिसांसह अन्य दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 7 फेब्रुवारी 2016 रोजी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये हरयाणा पोलिसांनी कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीला एका चकमकीत ठार केले होते. हरयाणा पोलिसांच्या मते, ही चकमक स्वसंरक्षणात झाली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात हा ‘फेक एन्काउंटर’ असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात गडोलीची मैत्रीण दिव्या पाहुजा हिने त्याला जाळ्यात अडकवल्याचा आरोप होता. तर दिव्याचीही हत्या हरयाणात करण्यात आली होती. या खटल्यावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाने या खटल्यात 43 साक्षीदार तपासले होते आणि सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स व बॅलिस्टिक रिपोर्ट पुरावे म्हणून सादर केले होते. मात्र, हे पुरावे ‘हत्या’ आणि ‘कट’ सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली.