ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले! मार्लेश्वर तिठा येथे खासगी कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांचा संताप

sangameshwar-marlshwar-titha-road-digging-private-company-monsoon-public-outrage

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपा मार्गावर मार्लेश्वर तिठा येथे ऐन पावसाळ्यात रस्त्याची खोदाई व रस्त्याच्या बाजूने खोदाई करून केबल टाकण्याचे सुरू असलेले काम थांबवण्यात आले होते. मात्र या कामाला एका दिवसात पुन्हा गुरूवारी सुरूवात झाल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.

हे काम पावसाळ्यातच करण्यामागचा खासगी कंपनीचा उद्देश काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. तर मार्लेश्वर तिठा येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचा नाहक त्रास होत असल्याचे बोल वाहनचालकांमधून उमटत आहेत.

देवरूख-साखरपा मार्गावर मार्लेश्वर तिठा येथे खासगी कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे हे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आल्याने कंपनीच्या हेतूबद्दल सवाल विचारला जाऊ लागला आहे. केबल टाकण्यासाठी मार्लेश्वर तिठा येथे रस्ता खोदण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूने खोदाई करून माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यातच कहर म्हणजे हे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आल्याने कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक कंपनीवर धडक देणार असल्याचे समजते.