
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन पूर्णपणे काळजी घेत आहे. सर्व उपाययोजना करूनही कोरोना नियंत्रणात न आल्यास संगमनेरमध्ये पूर्ण लॉकडाउन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने या पार्श्वभूमीवर त्यांनी संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पंचायत समिती सभापती सुनंदा वाकचौरे, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, डॉ. सोनाली बांगर, डॉ. भागवत दहीफळे डॉ. राजकुमार जऱहाड, डॉ. संदीप कचेरिया आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, नगर जिल्ह्यातील संगमनेर शहर हे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अग्रेसर आहे. संगमनेरची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. कंटेन्मेंट झोन करूनही यश का मिळत नाही, हा आता परीक्षणाचा विषय बनला आहे. प्रशासकीय पदाधिकारी आणि कर्मचाऱयांचा एक प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत. परिसर शहर आणि तालुक्यातील टेस्टिंग वाढवावी, संगमनेरची परिस्थिती चिंताजनक असून, लोकसंख्येच्या तुलनेत 25 टक्के नागरिक या ठिकाणी बाधित झालेले आहेत. चाचणीत दहा रुग्ण आढळल्यास तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात यावा, अशा परिसराचे शंभर टक्के व्हॅक्सिनेशनला प्राधान्य देण्यात यावे.
पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच पदाधिकारी याबाबत प्रतिसाद देणार नसेल, तर त्यांना नोटीस पाठवणार आहोत. शिस्तभंग केल्यास तलाठी, ग्रामसेवक, सरपंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
राज्य शासनाने शाळा व मंदिराबाबत घेतलेला निर्णय हा राज्यासाठी लागू असला तरी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर त्या-त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातील व त्याचे आदेशही कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. संगमनेर शहराची कोरोना बाधितांमध्ये अशीच लक्षणीय वाढ होत राहिल्यास लॉकडाऊनशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, विस्तार आणि लोकसंख्येने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यात सुरुवातीपासून रुग्णसंख्या अधिक आहे. दैनंदिन रुग्णसंख्या बहुतांश दिवस शंभरच्या पुढेच आहे. संगमनेरसह पारनेर तालुक्यात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पारनेरमधील 11 आणि संगमनेरमधील 31 गावांमध्ये याआधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत.



























































