लसीकरणाआधी होणार रॅपिड अँटीजेन चाचणी, संगमनेरात होणार राज्यातील पहिलाच प्रयोग

तालुक्यात लसीकरणाआधी नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार असून, तहसीलदारांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, यामुळे लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आटोक्यात येण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.

सध्या जिह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात जिह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यातच लसीकरण केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने व लसींचाही तुटवडा असल्याने लसीकरण केंद्रांवर वाद होत होते. ऑनलाइन नोंदणीमुळे होणारे वाद, लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये काही निर्देश दिले होते.

या अनुषंगाने संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांना आदेश बजावले आहेत. लसीकरणासाठी येणाऱया प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन चाचणी करून त्यातून संबंधिताला लक्षणे दिसून आल्यास त्याला लसीकरण केंद्राच्या जवळील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे, मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या