वखार महामंडळाच्या गोदामाची आग 24 तासानंतरही धुमसतेय, कोट्यवधींचे धान्य, कापूस जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर शहरातील बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामास मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाकडून आग विझविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात येत होती. मात्र, बुधवारी सायंकाळी हवेमुळे ही आग पुन्हा भडकली असून, उशिरापर्यंतही आग विझविण्याचे काम सुरू होते. या भयंकर अग्नितांडवात कापसासह 22 कोटींच्या धान्याची राखरांगोळी झाल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महारष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम आहे. मंगळवारी सायंकाळी या गोदामातून धूर येऊ लागल्याने बाजार समितीच्या कर्मचाऱयांनी अग्निशमन विभाग आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच 2, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे 2 अग्निशमन बंब, मालपाणी उद्योग समूहाचे टँकर, अकोले येथील अगस्ती साखर कारखान्याचे 1 अग्निशमन बंब, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. यांसह शिर्डी, राहता, सिन्नर, श्रीरामपूर नगरपालिकांच्या अग्निशमन बंबांनाही आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंतही ही आग आटोक्यात आलेली नव्हती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी हवेच्या प्रवाहामुळे ही आग पुन्हा भडकली. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या घटनेत कापसाच्या 13 हजार 165 गाठी, नाफेडने खरेदी केलेला 8 हजार 823 पोती हरभरा, 250 गोणी मिरी, 245 पोती सोयाबीन, 210 गोटी गहू, 1 हजार 400 गोणी बाजरी आणि गोदाम असे तब्बल 22 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

ही भयंकर आग लागल्याची माहिती मिळताच आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, बाजार समिती सचिव सतीश गुंजाळ, महसूल विभागाचे अधिकारी, नगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.