सांगली जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचा चौथा बळी

473

सांगली जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने चौथा बळी घेतला. कडेगाव तालुक्यातील नेरली येथील पंचावन्न वर्षे रुग्णाचा मृत्यू झाला तर आज आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 109 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्ह्यात यापूर्वी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात विजयनगर सांगली, कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द आणि शिराळा तालुक्यातील मोहरे येथील रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेला चौथा रुग्ण कडेगाव तालुक्यातील नेरली येथील आहे. जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवारी दिवसभर एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. मात्र शनिवारी सकाळीच आठ जण नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये औंढी तालुका जत येथील 55 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. सदर व्यक्ती 16 मे रोजी मुंबईहून आलेली आहे. खानापूर तालुक्यातील कारंजे येथील 30 वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला असून सदर व्यक्ती 18 मे रोजी मुंबईहून आलेली आहे.

नेर्ली येथील काल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा 28 वर्षिय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे. रेड तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय 20 वर्षीय पुरुष नातेवाईक कोरोना बाधित झाला आहे. खिरवडे तालुका शिराळा येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय 52 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. कचरेवाडी तालुका तासगाव येथील 28 वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे. आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा कोरोना बाधित झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या