सांगलीत सात महिन्यांत 30 हजार वाहनांची भर, इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत मोठी वाढ

शहरासह जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच गेल्या सात महिन्यांत आता नव्याने 30 हजार 191 वाहने रस्त्यावर धावत आहेत. सांगली परिवहन कार्यालयात जानेवारी 2024 ते जुलै 2024 या काळात नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. यात दुचाकी, चारचाकी आणि विविध वापराच्या वाहनांचा समावेश आहे. नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडेही कल वाढला आहे. सहा महिन्यांत 2 हजार 843 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीदेखील नागरिकांकडून झाली आहे. 2 हजार 752 इलेक्ट्रिक बाईक, 70 इलेक्ट्रिक कार, चार ई-रिक्षा आणि 17 इलेक्ट्रिक मालवाहतुकीच्या वाहनांचा समावेश आहे.

सांगली शहर आणि जिल्हा जसा वाढत आहे, तशी वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यात असणाऱ्या वाहनांची संख्या पाहिली तर मोठ्या शहरांच्या यादीत सांगलीचे नाव येते. यंदाच्या वर्षी गेल्या सात महिन्यांत दुचाकी वाहनांची विक्री वाढली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक संख्येने मोटारसायकली आहेत. शेतीप्रधान जिल्हा असल्याने ट्रॅक्टर व ट्रेलर यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. गेल्या सहा महिन्यांत 22 हजार 615 दुचाकींची विक्री झाली आहे. यंदा चारचाकी वाहनांच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांत 4 हजार 232 आलिशान मोटारी सांगलीकरांनी घेतल्या आहेत. मात्र, अनेक वाहनांना प्रतीक्षा असल्याने रजिस्ट्रेशन झाले नाही. ट्रॅक्टर खरेदीही वाढली आहे. 1 हजार 393 ट्रॅक्टर शेतकऱ्यानी घेतले आहेत. शहराच्या विस्तारामागे कारणे बरीच असली तरी त्यामुळे नागरिकांचे प्रवासाचे अंतर वाढले. विस्तारित भागांमधील त्यांच्या स्वतःच्या घरांपासून नोकरीची ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मुलांच्या शैक्षणिक संस्था सात ते आठ किमी लांब गेल्या. धावपळीच्या जगण्यात वेळेत तिथवर प्रवास करायचा म्हटला तरी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था पुरेशी नाही. अशावेळी प्रत्येकाच्या हाताशी वाहन असणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा वाहन खरेदीकडे कल वाढला असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढतेय

सांगली जिल्ह्यात आता पर्यारणपूरक वाहनांची क्रेझ वाढत असून, इथले वाढते प्रदूषण रोखण्याला या गाडय़ांमुळे थोडाफार तरी हातभार लागणार आहे. गेल्या सहा महिन्यांत 2 हजार 843 ई-वाहनांची विक्री झाल्याची नोंद ‘आरटीओ’कडे आहे. त्यात 2 हजार 752 इलेक्ट्रिक दुचाकी असून, 70 इलेक्ट्रिक कार आहेत. ई-रिक्षा चार, तर इलेक्ट्रिक मालवाहतूकची संख्या 17 आहे. दरम्यान, सांगलीतील अनेक ठिकाणी चार्ंजग स्टेशनची उपलब्धता झाली असून, सर्व गाडय़ांची शोरूम्स झाल्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

सहा महिन्यांत खरेदी केलेली वाहने

वाहनांचा प्रकार संख्या

दुचाकी     22,615

मोपेड      62

कार       4,232

ट्रॅक्टर      1,393

रिक्षा       185

गुड्स कॅरिअर  1,111

बस, मिनी बस 55

रुग्णवाहिका 09

डंपर       97

अग्निशमन बंब 03

मोटार कॅब  116

क्रेन       35

हार्वेस्टर    37

कन्स्ट्रक्शन ट्रक      47