
लाचप्रकरणी अटकेत असलेला पालिकेचा शाखा अभियंता अल्ताफ मकानदार याचे घर आणि खासगी कार्यालयाची झडती घेण्यात आली. यावेळी 20 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने आढळले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ती रोकड ताब्यात घेतली असून, मकानदार याच्या उत्पन्नाचे आर्थिक स्रोत आता तपासले जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
अल्ताफ मकानदार हा नगररचना विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे. महापालिकेच्या कुपवाड कार्यालयात त्याचा कक्ष आहे. तक्रारदारांनी दोन प्लॉटचे एकत्रीकरण आणि त्या प्लॉटवर बांधकाम परवाना मिळण्यासाठी दोन अर्ज कुपवाड कार्यालयातील बांधकाम विभागात दिले होते. हे काम पूर्ण करून देण्यासाठी मकानदार याने 45 हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने 10 नोव्हेंबर 2021 रोजी तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे समोर आले.
दरम्यान, 10 फेब्रुवारी 2022 रोजी मकानदार याची पुन्हा पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदार यांच्याशी नवीन कामासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी जुने काम करून दिल्याबाबत पहिल्यांदा 40 हजारांची मागणी केली. चर्चेअंती 30 हजारांची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. मात्र, शंका आल्याने लाच स्वीकारली नाही. त्याविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
त्यानंतर मकानदार याच्या मिरजेतील अल्फोन्सा स्कूलजवळील बंगल्यावर छापे टाकत झडती घेण्यात आली. तसेच त्याच्या खासगी कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. यात 20 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोन्याचे दागिने आढळून आले आहेत.
मनपातील अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेतील काही अधिकाऱयांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. मकानदार यास आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.























































