
पाणलोटक्षेत्रात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून, चांदोली धरणातील विसर्गात साडेतीन हजारांनी वाढ करून 11 हजार 585 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने 42 हजार 100 क्युसेकने दुसऱया दिवशीही विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी एक फुटाने वाढली. त्यात आणखी वाढ होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिह्यात दिवसभर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
सांगली जिह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर धरणक्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस होत आहे. चांदोली धरणक्षेत्रात 73 मि.मी. पाऊस झाला असून, धरणातील पाणीसाठा 29.60 टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणातून साडेतीन हजारांनी विसर्ग वाढविण्यात आला. बुधवारी दुपारपासून धरणातून 11 हजार 585 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणक्षेत्रात 92 मि.मी. पाऊस झाला असून, धरणात 85.97 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 42 हजार 100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांतील अनेक गावांमध्ये दिवसभर पाऊस सुरू राहिला. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील पाणीपातळी कमी झाल्याने पुराचा धोका टळला होता; परंतु पुन्हा पाऊस आणि धरणातून विसर्ग वाढविल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली. त्यामध्ये आणखी काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा 67.62 टीएमसी झाला असून, तीन लाख 23 हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणातून तीन लाख 50 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.