संगमेश्वर धामणी येथे वॅगनार कारला अपघात राजापुरातील 3 प्रवासी जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकासमोर वॅगनार कारला अपघात झाला. या अपघातात राजापुरातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला.

सविस्तर वृत्त असे की, राजापुरातून मुंबईला जाणाऱ्या वॅगनार कारला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास धामणी – संगमेश्वर रोडे रेल्वे स्थानकासमोर अपघात झाला. मुंबईहून येणाऱ्या गाडीला वाचविण्याच्या नादात कार चालकाने गाडी बाजूला घेतली. यावेळी गाडी मोरीच्या खड्ड्यात गेल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडी खड्ड्यात पडल्यानंतर तिघेजण जखमी झाले. तिघांमध्ये एका वृध्द महिलेचा समावेश आहे. राजेंद्र पारकर (53, राजापूर), विशाल पारकर ( 46 , राजापूर), अन्य एक महिला (60) असे तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान पुन्हा एकदा महामार्गावरील खड्डे आणि मोऱ्यांसाठी खोदण्यात आलेल्या खंदकांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यावर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे गाडी खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये तिघांना दुखापत झाली आहे. आरवली ते बावनदी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे जे काम सुरु आहे त्या भागात ठेकेदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा करणाऱ्या ठेकेदार कंपनी विरूध्द कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे पर्शुराम पवार यांनी केली आहे .