संगमेश्वर तालुक्यात खतांचा काळा बाजार? पंचायत समिती सदस्याने केली चौकशीची मागणी

441
प्रातिनिधिक फोटो

ऐन शेतीच्या हंगामात कृषी विभागाचा बोगस कारभार समोर आल्याची जोरदार चर्चा साखरपा परिसरात सुरू आहे. एकाच खात्याच्या दोन विभागांचे विसंगत अहवाल सबंधित तक्रारदाराला प्राप्त झाल्याची घटना कृषी विभाग संगमेश्वर तालुका विभागात घडल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य जया माने यांनी केली आहे.

कोंडगाव बाजार पेठेतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे गोडाऊन कृषी विभागाच्या संगमेश्वर पंचायत समिती विभागाने व तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासले असता त्यांच्या अहवालात तफावत आढलल्याचे दिसून आले त्यामुळे या विभागाचा भोंगळ कारभार जनतेसमोर आला आहे.

यंदा लॉकडाऊनमुळे मुंबईकर चाकरमानी गावीच अडकल्याने शेती मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे खतांची मागणी वाढली असून खताची कमतरता जाणवत होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पंचायत समिती सदस्य जया माने यांचाशी संपर्क साधून तक्रारीचा पाढा वाचला. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित माहितीचा अहवाल मागितला. त्यावेळी त्या विक्रेत्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी तालुका कृषी विभागाच्या अहवालात खत योग्य असल्याचा अहवाल जाहीर झाला, परंतु पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या अहवालात त्या ठिकाणच 12.150 मेट्रिक टन खत पॉस मशीनवर नोंद करायच्या आत विक्री केल्याचे आढळले व त्यांनी त्या विक्रेत्याला नोटीस दिली. त्यामुळे तालुका कृषी विभाग संबंधित विक्रेत्याला पाठीशी घालतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विक्रेते व कर्मचारी यांमध्ये काही साटेलोटे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

तसेच हा माल स्थानिकांना न देता इतर कोणत्या जिल्ह्यात विक्रीस जाते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबधित जबाबदार घटकांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे व शेतकऱ्यांचा पाठीशी असल्याचे जया माने यांनी सामनाला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या