स्वच्छता दूत असणाऱ्या मनोरुग्णांना राजरत्नने दिला मायेचा हात, संगमेश्वर मधून दोन मनोरुग्ण घेतले ताब्यात

उन , वारा , पाऊस आणि थंडी या कशाचीही तमा न बाळगता गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूला असणारा कचरा एकत्र करुन परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृध्द मनोरुग्णाला आणि महामार्गावर टाकल्या जाणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करुन जणू ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणाऱ्या मनोरुग्ण महिलेला रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानने संगमेश्वर येथे येवून ताब्यात घेतले आणि त्यांना मायेचा हात देत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनोरुग्णालयात भरती केले. राजरत्नच्या या कामगिरीबद्दल संगमेश्वरवासीयांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

संगमेश्वर नजीकच्या माभळे येथे एक महिला महामार्गालगत स्वतःचे जेवण करुन जेवते. या मनोरुग्ण महिलेला पुढील दोन दिवसांत होणाऱ्या अतिवृष्टीत धोका निर्माण होवू शकतो. अशा आशयाची एक पोस्ट छायाचित्रासह रामपेठ संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी सोशल मिडियावर केली होती. ही पोस्ट माभळे पुनर्वसन येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत यांनी पाहिली आणि त्यांनी लगेचच मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठान या संस्थेच्या सचिन शिंदे यांच्या जवळ संपर्क साधला. शिंदे यांनी आपल्या टीमसह संगमेश्वर येथे येण्याचे मान्य केले.

साधारण 40 वर्षे वयाची एक महिला संगमेश्वर मध्ये चार महिन्यांपूर्वी दाखल झाली. आल्यापासून ती महामार्गाच्या दुतर्फा टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करत होती. यासाठी ती माभळे येथून रत्नागिरीच्या दिशेने बावनदी पर्यंत तर चिपळूणच्या दिशेने सावर्ड्या पर्यंत जावून प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोणपाटात भरुन आणायची. मनोरुग्ण असूनही ती पर्यावरण वाचवण्याचा संदेश आपल्या कामातून देत होती . एकत्र केलेल्या सर्व बाटल्या ती भंगारात विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. असे असले तरी तिच्या मनावर मोठा आघात झालेला असल्याने ती मध्येच ओरडायची आणि मुक्या प्राण्यांजवळ बोलत बसायची. माभळ्यात साधना बेंडके यांच्या हॉटेलमध्ये जावून रोज चहा, पाव आणि दूध अशा वस्तू ती पैसे देवून घ्यायची. बेंडके यांच्या हॉटेलच्या बाजूलाच एका उघड्या शेड मध्ये ती रात्रीची निवाऱ्याला असायची.

सुमारे सहा वर्षांपूर्वी संगमेश्वर मध्ये एक 60 वर्षे वयाचा वृध्द मनोरुग्ण आला. त्याचा कोणालाही त्रास नसल्याने तो माभळे आणि संगमेश्वर असा फिरत असला तरी त्याला कोणीनाकोणी खायला प्यायला देत असंत. या वृध्द मनोरुग्णाला महामार्गालगतचा परिसर स्वच्छ करणे ही एकच आवड. सकाळी 6 वाजल्यापासून महामाजवळचा पालापाचोळा , अन्य कचरा एकत्र करुन जाळून टाकायचा हे एकच त्याचे काम. माभळे संगमेश्वरवासीयांना या वृध्दाचा त्याच्या स्वच्छतेच्या कामासह स्वभावामुळे लळा लागला आणि त्याचे ‘ राजाभाऊ ‘ असे नामकरणही झाले. उजव्या ढोपराची शस्त्रक्रिया झालेली असल्याने हा वृध्द कमरेत वाकून चालायचा . माभळ्यात फिरत असतांना साधना बेंडके या आपल्या हॉटेलातून राजाभाऊना दररोज तीन वेळा चहा आणि दोन वेळा नाष्टा गेली सहा वर्षे न चुकता देत होत्या . यामुळे राजाभाऊच्या बद्दल त्यांना आत्मियता वाटू लागली . अशातच बोलताबोलता राजाभाऊने बेंडके यांना आपण अमरावती मधील चांदोर रेल्वे स्थानकाच्या बाजूला रहात होतो अशीही माहिती सांगितली होती.

राजाभाऊ असोत अथवा ती महिला दोघेही माभळे – संगमेश्वर मधील ” स्वच्छता दूत ” होते . दोघांना जे काही खायला मिळेल त्यातील थोडा हिस्सा ते भटक्या श्वानांना घालत. त्यामुळे या दोघांच्या आजूबाजूला सात – आठ श्वान जणू त्यांच्या संरक्षणासाठीच कायम उभे असायचे. आज राजरत्नचे सचिन शिंदे आपले सहकारी सौरभ मुळ्ये , जया डावर यांच्यासह या दोघांना ताब्यात घेण्यासाठी माभळे संगमेश्वर येथे दाखल झाले त्यावेळी देखील शेवटच्या भेटीसाठी पाच – सहा श्वान या दोन्ही मनोरुग्णांभोवती जमा झाले होते. सचिन शिंदे यांनी प्रथम दोघांचेही जटा झालेले केस कापले नंतर सहकाऱ्यांनी त्यांना स्वच्छ आंघोळ घालून नवीन कपडे घालायला दिले. दोघांनी हे सर्व करुन घ्यायला सुरुवातीला थोडा विरोध केला मात्र राजरत्नला अशा कामांचा अनुभव असल्याने त्यांनी युक्तीने सारे निभावून नेले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत, अमोल शेट्ये, अविनाश सप्रे, पत्रकार दीपक भोसले , उद्योजक दीपक भिडे, साधना बेंडके, प्रशांत दळी, किशोर प्रसादे आदि मदतीसाठी उपस्थित होते. राजरत्न प्रतिष्ठानचे हे कार्य पाहून उद्योजक दीपक भिडे यांनी राजरत्नच्या सचिन शिंदे यांच्याकडे 5125 रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. दोन्ही मनोरुणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनोरुग्णालयात भरती करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. राजरत्नने आजवर ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केलेल्या मनोरुग्णांची संख्या आता 99 झाली आहे.

बेंडके यांना अश्रूअनावर

ज्यांचे राजाभाऊ असे नामकरण झाले त्या वृध्द मनोरुग्णाला घरच्या माणसाप्रमाणे माभळे येथील हॉटेल चालिका साधना बेंडके या गेली सहा वर्षे दररोज न चुकता चहा नाष्टा देत होत्या, त्यांच्याशी संवाद साधत होत्या. महिला मनोरुग्ण देखील बेंडके यांच्या हॉटेल समोर असल्याने गेल्या चार महिन्यात ती देखील त्यांच्या जवळ एका अनामिक नात्याने जोडली गेली होती. आज राजरत्नने दोघांनाही मनोरुग्णालयात भरती करण्यासाठी गाडीत बसवल्यानंतर साधना बेंडके यांना अश्रू अनावर झाले. सचिन शिंदे यांनी बेंडके यांना धीर देवून दोघांचीही काळजी करु नका त्यांना त्यांचे नातलग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या