संगमेश्वर येथे भरधाव क्वालिस कंटेनरवर आपटून अपघात; एक ठार, दोन जखमी

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जाखमाता मंदिर नजीक एक भरधाव क्वालिस कंटेनरवर समोरासमोर आदळून झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून क्वालिसमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सकाळी 8 वाजता घडला.

गोरेगाव मुंबईहून मालवण जि. सिंधुदुर्गला निघालेली क्वालिस क्रमांक एम.एच. 04 एवाय 8088 (चालक निखील टेमकर) भरधाव वेगाने जात असतांना मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जाखमाता मंदिरानजीक क्वालिसची समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात क्वालिस मधील सीमा जगदीश पडवळ (वय 56 रा. गोरेगाव, मुंबई) या जागीच ठार झाल्या. तर क्वालिसमधील जगदीश ज्ञानदेव पडवळ (60) व सौरभ जगदीश पडवळ (25, दोन्ही रहाणार गोरेगाव, मुंबई) हे गंभीर जखमी झाले. क्वालिसची कंटेनरला बसलेली धडक एवढी जोरदार होती की, क्वालिसची पुढील बाजू कंटेनरच्या खाली जाऊन सर्व प्रवासी आतमध्ये अडकून पडले. संगमेश्वर येथील मंदार खातू, रौफ खान, निखिल लोध आदींनी जखमींना बाहेर काढले. याच दरम्यान देवरुख येथील व्यापारी संजय पटेल महामार्गावरुन जात असताना त्यांनी आपल्या कार मधून जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघातामधील जखमी जगदीश पडवळ आणि सौरभ पडवळ यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी डेरवण हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास हे. कॉ. भाई झापडेकर हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या