किटकनाशकांची फवारणी आरोग्याला धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी सध्या ठिकठिकाणी कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणावर फवारणी केली जात आहे. मात्र या फवारणीचा कोरोनाव्हायरसवर कोणताही परिणाम होत नसून मानवी आरोग्याला मात्र धोका निर्माण होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. बाजार, गल्ली-बोळात होणारी फवारणी त्या ठिकाणच्या मोठ्या प्रमाणावरील अस्वच्छता आणि धुळीमुळे निष्क्रिय ठरत असल्याचे डब्ल्यूएचओ म्हटले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक जंतुनाशक यांची फवारणी सुरू आहे. मात्र ही फवारणी कोरोनो रोखण्यासाठी परिणामकारक ठरत नसल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे शरीरावर केली जाणारी जंतुनाशकांची फवारणी आणखीनच धोकादायक आहे. या फवारणीमुळे गंभीर आजार होण्याचा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. कीटकनाशकांचा वापर केला जात असेल तर कपड्यांच्या सहाय्याने जागा स्वच्छ करण्यासाठी उपयोग करता येऊ शकते असा सल्लाही दिला आहे.

असे होत आहेत दुष्परिणाम
डब्ल्यूएचओने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कीटकनाशकांची फवारणी शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका पोहोचवू शकते. माणसाच्या शरीरावर क्‍लोरिन किंवा अन्य विषारी रसायनांची फवारणी केल्यास डोळे, त्वचेची जळजळ, श्वास घेण्यात अडथळा आणि पोटाच्या विकारांना निमंत्रण मिळू शकते.