मतदार यादीतील घोटाळे, EVM-निवडणूक यंत्रणेतील भ्रष्टाचार; भाजपची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्र आवाज उठवणं गरजेचं! – संजय राऊत

मतदार यादीतील घोटाळे, ईव्हीएम-निवडणूक यंत्रणेतील भ्रष्टाचार, भाजपची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्र आवाज उठवणे गरजेचे आहे. हे एकट्याचे काम नाही, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. याच संदर्भात मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असून हे अराजकीय शिष्टमंडळ असल्याचे ते म्हणाले.

आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार असून त्यांना एक निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊ. यासाठी शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे, कॉ. अजित नवले, सुभाष लांडे, रईस खान, जयंतराव पाटील या सर्वांना आमंत्रित केले आहे, असे राऊत म्हणाले.

मनसेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे. जसे अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांचा निर्णय अमित शहा दिल्लीत घेतात, काँग्रेसचेही तसेच आहे. महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत, जे स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत. एका पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीत निर्णय घेतील. दुसरे जे दोन पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय शहा घेतात. कारण तो त्यांच्या मालकीचा पक्ष आहे. ज्यांचे नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील आणि आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ.

नाशिकमधील गुंडगिरीविरुद्ध सुरू झालेली मोहीम ठाण्यातही राबवावी, संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन