काही मिनिटांच्या भेटीसाठी चार तास थांबवून ठेवलं, बंजारा समाजाचे महंत संजय राठोडांवर भडकले

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज हे काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र आपल्या समाजातील महंत आल्याचे कळाल्यानंतरही राठोड यांनी त्यांना तब्बल चार तास वाट पाहायला लावली. त्यानंतर त्यांनी अवघा 10 मिनिटांचा देखील वेळ दिला नाही, असा आरोप या महंतांनी केला आहे.

”मी बंजारा समाजाचे प्रश्न , समाजहिताचे प्रश्न व पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत संजय राठोड यांच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र त्यांनी आपल्याला जी वागणूक दिली ती न सांगण्यासारखी आहे. मला त्यांनी कार्यालयात चार तास थांबवून ठेवले. त्यानंतर दहा मिनिटासाठी देखील ते आपल्याला भेटले नाहीत. त्यांच्या देहबोली व वागण्यावरून मी आलेलो त्यांना फारसे आवडले नसल्याचे दिसून आले, असे महंतांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.