
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी दाखल अर्ज माघारी घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार आहे. मात्र अर्ज मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी धमक्या, ब्लॅकमेलिंग, पैशाचा वापर सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्यांवरही मंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत म्हणाले, निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांकडून दबाव आहे. गेल्या दोन-तीन दिवसांसून त्यांना मंत्र्यांचे फोन जात आहेत. हे फोन का आणि कशाकरता जात आहेत? आचारसंहिता लागू असताही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता. त्याच्यामध्ये काही आरओ होते. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन स्वत: केले नाही तर ते उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर आचारसंहितेचे पालन करायला सांगतात? या सगळ्या आरओचे फोन रेकॉर्ड निवडणूक आयोगाने तपासले पाहिजे. त्यांना कोणत्या मंत्र्याचे कधी फोन गेले, उपमुख्यमंत्र्यांचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज बाद केले. उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरओच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचा विषय अत्यंत गंभीर आहे. 30 डिसेंबर रोजीचे चार वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. विधानसभा अध्यक्षांचे सीसीटीव्ही फुटेज गायब कसे होते? भुषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त असून ते ही या कारस्थानात सामील झाले आहेत का? विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या, सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. याबाबत निवडणूक आयोगाने चौकशीही सुरू केली आहे. महापालिका आयुक्तांनी याचे उत्तर दिले आहे. या विभागातील आरओंचीही चौकशी व्हायला पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार सुरू असून माघार घेत नाही म्हणून जळगावात उमेदवारांचे अपहरण केले आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी जबरदस्तीने माघार घ्यायला लावली. बिनविरोध निवडून आणण्यासाठी धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्त काय करत आहेत? महानगरपालिकेला इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून आले नव्हते. पण धमक्या देऊन, ब्लॅकमेल करून, दहशत निर्माण करून लोकांना माघार घ्यायला लावली. काल आणि परवा ठाण्यातील सर्व प्रमुख निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाड्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारात लागलेल्या होत्या. त्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये ही बिनविरोधची प्रक्रिया सुरू झाली. भाजप आणि मिंधे गटातील ही स्पर्धा असून त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवार होतोय. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम काय करत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
निवडणूक अधिकारी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर संबंधित ठिकाणच्या पालकमंत्र्यांचा दबाव आहे. ही लोकशाही आहे का? याला निवडणूक म्हणतात का? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वातावरण कधीच निर्माण झाले नव्हते. भाजप, मिंधे आणि अजित पवार यांनी हे सुरू केले. महाराष्ट्रातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले. कोणत्याही गुंडाचे, टोळीचे नाव घ्या, सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भाजपबरोबर सत्तेत सामील आहे. सर्वत्र धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही त्या धमक्यांना भीक घालणारे नव्हे. आम्ही तुमच्या छाताड्यावर उभे राहून भगवा फडकवू, असे संजय राऊत म्हणाले.




























































