जागतिक कीर्तीचे उद्योगपती रतन टाटांवर लोकांचा विश्वास असल्यामुळेच त्यांच्या जाण्याने अवघा देश, मध्यमवर्गीय हळहळला. अशाच प्रकारे ठाकरेंवर राज्यातील जनतेचा ट्रस्ट (विश्वास) आहे. हे भगवे वादळ ठाकरेंच्या मागे उभे आहे. उद्धव ठाकरेंना राज्याचे नेतृत्व करावे लागेल. त्यामुळे दोन महिन्यांनंतर शिवतीर्थावर विजयी मेळावा होणार, असा ठाम विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवतीर्थावरील आजचा मेळावा हा केवळ दसरा मेळावा नाही तर लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांचा दारुण पराभव केला त्याचा हा विजयी मेळावा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवतीर्थावर शिवसेनेच्या मेळाव्यातून विचारांचे सोने लुटायला शिवसैनिक आले आहेत, पण काही लोक महाराष्ट्र लुटायला आले आहेत. मिंधे सरकारला टोला लगावताना ते म्हणाले की, कावळ्यांकडे दिला कारभार, त्यांनी हगून ठेवला दरबार, अशी सरकारची अवस्था झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हागणदारीमुक्त गावाप्रमाणे आता हागणदारीमुक्त मंत्रालय करायचे आहे, असेही ते म्हणाले. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात मशाल नावाच्या शस्त्राची पूजा झाल्याचे सांगत, ‘एक चिंगारी काफी है मशाल जलाने के लिये और एक मशाल काफी है ज्वालामुखी जलाने के लिये,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मिंध्यांनी सुरतला मेळावा घ्यायला हवा!
मिंध्यांचा मेळावा आझाद मैदानावर झाला त्याचा उल्लेख करताना आझाद मैदानावर चोराची आळंदी आहे, तर शिवतीर्थावर देवाची आळंदी आहे. या ठिकाणी निष्ठावंतांचा मेळावा आहे. त्या मैदानाचे नाव आझाद मैदान आहे, पण व्यासपीठावर मोदींचे गुलाम आहेत. मिंध्यांना ठणकावत ते म्हणाले की, अरे लाज राख या आझाद मैदानाची. मिंध्यांनी त्यांचा मेळावा गुजरातमधल्या सुरतमध्ये घ्यायला पाहिजे होता. कारण त्यांच्या पक्षाचा जन्मच सुरतच्या गर्भातून झालेला आहे. ते जगले-वाचले तर त्यांनी पुढचा मेळावा गुजरातला घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
सब भूमी अदानी की!
गुजरातचे दोन ठग संपूर्ण महाराष्ट्र लुटत असल्याचे सांगत त्यांनी कशा प्रकारे सर्व जमिनी आणि प्रकल्प अदानांनी दिले जात असल्याचे दाखले दिले. धारावी प्रकल्पासाठी 256 एकर मिठागराची जमीन अदानींच्या घशात घातली आहे. महाराष्ट्र लुटून गुजरात सोन्याने मढवले जात असल्याचे ते म्हणाले. आचार्य विनोबा भावे यांच्या ‘सब भूमी गोपाल की’ या वक्तव्याप्रमाणे मोदी शहा सब भूमी अदानी की करीत आहेत. सब भूमी एजंट, दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांना देत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंच्या भाषणाने नव्या पर्वाची सुरुवात
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात भाषण केल्याबद्दल गौरवोद्गार काढताना संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने शिवसेनेच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.