बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे अमित शहांना ओळखतही नव्हते तरी त्यांनी मदत केली, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

बाळासाहेब ठाकरेंनीच गोध्रावेळी नरेंद्र मोदींना वाचवलं होतं ही बाब सर्वश्रृत आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे अमित शहांना ओळखतही नव्हते तरी त्यांनी मदत केली, असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी अमित शहा मातोश्रीवर आले होते. आताच्या भाजप नेत्यांना याबाबत काहीच माहित नाहिये. शरद पवार यांनीही अमित शहांना तेव्हा मदत केली होती. मी जेव्हा शरद पवार यांना पुस्तक द्यायला गेलो तेव्हा त्यांना मी सांगितलं की मी असं पुस्तकात म्हटलं आहे. तेव्हा पवार म्हणाले की आता अमित शहा यावर काय बोलतील हे पहायला हवं. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना वारंवार विनंती केली आणि चर्चा केली हे मला माहित आहे. तेव्हा अमित शहा यांना फार कोणी ओळखत नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे पवारांनी मोदींना विचारलं की हा माणूस कोण आहे. माझा खास माणूस आहे, कामाचा माणूस आहे असे मोदी पवारांना म्हणाले होते. बाळासाहेबही अमित शहांना ओळखत नव्हते. तेव्हा शहा हे एक आमदार होते. बाळासाहेबांनी पेपरमध्ये शहांचा फोटो पाहिला आणि मला विचारलं आपण याच व्यक्तीला मदत केली ना?

तसेच बाळासाहेब ठाकरेंनीच गोध्रावेळी नरेंद्र मोदींना वाचवलं होतं ना. ही बाब सर्वश्रृत आहे. मोदींना आम्हाला बदलायचं आहे हे आडवाणी बाळासाहेब ठाकरेंना महापौर बंगल्यात म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की मोदींनी बदलण्याची ही वेळ नाही. एक हिंदुत्वाचं वारं वाहतंय, आणि त्यांच्या भोवती गोंगावतंय, आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल. गुजरात आपल्या हातून जाईल मोदींना बदलू नका, हे बाळासाहेबांचं हे म्हणणं तेव्हा भाजपच्या पंतप्रधानांना मान्य करावं लागलं असे संजय राऊत म्हणाले.

तसेच राजकारणात पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा नंतर समोर येते. ती पटकथा लवकरच समोर येईल. ट्रम्पनी काल फक्त शब्द बदलला. आधी म्हणाले की हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान मी मदत केली. आता म्हणाले की मी मध्यस्थी केली. व्यापारी भाषेत याला दलाली म्हणातात. अ‍ॅपलने आपले स्मार्टफोन्स इथे बनवायला ट्रम्पने विरोध केला आहे. ही यांचे हिंदुस्थान आणि मोदी प्रेम असा टोलाही संजय राऊत म्हणाले.