
‘संपूर्ण जम्मू-कश्मीर गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. तिथले पोलीस गृहमंत्र्यांचा आदेश मानतात, तरीही पहलगाममध्ये हल्ला झाला. 26 निष्पाप लोक मारले गेले. सुरक्षेत चूक झाल्यामुळे हे घडल्याचे राज्यपालांनी मान्य केले, मग याची जबाबदारी घेऊन राजीनामा कोण देणार? पंडित नेहरू, डोनाल्ड ट्रम्प, जे. डी. वान्स हे देणार की गृहमंत्री अमित शहा देणार,’ असा रोकडा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत केला.
‘सत्तापक्षाला नेहमी नेहरूंची आणि सरदार पटेलांची आठवण येते. नेहरू हे महान होतेच, पण सरदार पटेल यांना पंतप्रधान न करून आपण ऐतिहासिक चूक केली आहे. ते पंतप्रधान झाले असते तर भाजपवाले संसदेत दिसलेही नसते. पटेल हे गृहमंत्री असतानाच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्यामुळे भाजपने उदारमतवादी पंडित नेहरूंचे कायम आभार मानले पाहिजेत, असा टोला संजय राऊत यांनी हाणला.
कुलभूषण जाधवला का सोडवून आणले नाही?
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान आपल्यासमोर गिडगिडत होता, तर मोदी सरकारने युद्धबंदी का केली, असा सवाल संजय राऊत यांनी केला. किमान पाकिस्तानच्या तुरुंगात नरकयातना सहन करणाऱ्या कुलभूषण जाधवला तरी सोडवून आणायला हवे होते, असे संजय राऊत म्हणाले.